Pune News | जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज, परिसरात क्लोरीन गॅस पसरताच…
Pune News | पिंपरी- चिंचवडमधील जलतरण तलावात धक्कादायक घटना घडली आहे. जलतरण तलावात असणारा क्लोरीन गॅस लिक झाला आहे. यामुळे क्लोरिन गॅस परिसरात पसरला. अनेकांना रुग्णालयात दाखल केले आहे. परिसरातील नागरिकांना या गॅसचा...
रणजित जाधव, पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जलतरण तलावात मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरीन गॅस लिकेज झाला आहे. यामुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला आहे. तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि गळ्याचा त्रास होत आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे आता कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
जलतरण तलावातील नागरिकांना रुग्णालयात हलवले
पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री अवैधरित्या गॅस भरताना नऊ सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर सर्वच जण हादरले होते. आता पिंपरी चिंचवडमधील मनपाच्या जलतरण तलावात नेहमी पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सुरु झाला. या तलावातून क्लोरीन गॅस लिक झाला. यामुळे या ठिकाणी असलेल्या 20 ते 22 जण आणि सुरक्षा रक्षकांना त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आहे. त्यांनी संबंधित व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम सुरु केले आहे. 11 लोक उपचारासाठी महापालिका वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्लोरीन गॅस कसा झाला लिक
पिंपरी चिंचवडमधील मनपाच्या जलतरण तलावात नेहमी अनेक जण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी अनेकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. तसेच खोकला येऊ लागला आणि गळ्याचा त्रास होऊ लागला. जलतरण तलावाच नाही तर या परिसरात ५०० मीटर पर्यंत लोकांना हा त्रास सुरु झाला. जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला होता. परिसरातील नागरिकांना त्रास सुरु होताच या परिसरातील रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे.
अशी असते पद्धत
जलतरण तलावात फिल्टर प्लँट आणि बॅलन्सिंग टाकी असते. फिल्टर प्लँट आणि क्लोरिन प्लँट जवळजवळ असतात. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिनचा वापर करतात. परंतु हे क्लोरिन किती सोडावे याचे प्रमाण ठरले असते. क्लोरिन सोडल्यानंतर तो बॅलन्सिंग टाकीतून मिसळतो. त्यानंतर हे पाणी फिल्टर प्लँटमध्ये जाते. त्यानंतर पाणी जलतरण तलावात सोडले जाते असते. या पद्धतीत पिंपरी चिंचवडमध्ये कुठे बदल झाला हे आता चौकशीनंतर समोर येणार आहे.