महापालिकेच्या सम-विषमच्या आदेशाला केराची टोपली, पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने सुरुच
पिंपरी चिंचवड महापालिकेने काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. पालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात सम आणि विषम तारखेला दुकाने उघडण्याचा आदेश दिलाय.
पिंपरी चिंचवड : कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत म्हणावी तेवढी घट झालेली नाही. याच गोष्टीमुळे खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. पालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात सम आणि विषम तारखेला दुकाने उघडण्याचा आदेश दिलाय. पण हा आदेश व्यापाऱ्यांनी धुडकवून लावला असून त्यांनी सरसकट दुकाने चालू ठेवली आहेत. (Pune pimpri chinchwad traders not obeying odd even corona rules shop kept open by them)
व्यापाऱ्यांना आर्थिक गणितं बिघडण्याची भीती
याविषयी विचारले असता कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. या काळात व्यावसायिक, व्यापारी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता दुकाने बंद केली तर व्यापार बंद पडेल. आर्थिक गणितं बिघडतील, अशी भीती व्यापारी तसेच व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे पिंपरी कॅम्प परिसरात निर्बंध लागू केलेले असूनदेखील व्यापाऱ्यांनी सम विषम तारखेचा विचार न करता दुकाने चालू ठेवली आहेत.
7 जूनपासून निर्बंध शिथील
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे 7 जूनपासून निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण तसेच ऑक्सिजनयुक्त बेड्सची ऑक्युपन्सी निकषावर राज्यातील विविध जिल्ह्यांत पाच टप्प्यात हे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. तशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे.
अन्यथा पुन्हा निर्बंध लागू करावे लागतील
दरम्यान, निर्बंध शिथील केल्यामुळे राज्यातील अनेक भागात लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे दिसते आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करुन नागरिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर नव्याने निर्बंध लागू करावे लागतील, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सोबतच सर्वांनी काळजी घेण्याचेही त्यांनी आवाहनही त्यांनी केले.
इतर बातम्या :
वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथमध्ये 265 जणांचा मृत्यू, पण फक्त 65 मृतकांची नोंद, खळबळजनक खुलासा
(Pune pimpri chinchwad traders not obeying odd even corona rules shop kept open by them)