Pune pmpml bus | पुणे बसमध्ये प्रवाशांसाठी ‘ही’ नवीन सुविधा, प्रवाशांचे टेन्शन वाचणार
Pune pmpml bus | पुणे शहर वाहतूक सेवेत अनेक सुधारणा केल्या जात आहेत. आता आणखी एक नवीन सुविधा सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांना या सुविधेचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांना आता खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (Pmpml ) बस सेवेने कात टाकली आहे. पुणेकरांसाठी पीएमपीएमएलने नवीन बसेस आणल्या आहेत. विना कंडक्टार बससेवा सुरु केली आहे. चालक, वाहकांना शिस्त लावली आहे. स्वत: पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी बसमधून अचानक प्रवास केला. त्यावेळी त्यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवारी बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले. आता आणखी एक सुविधा पीएमपीएमएलने रविवारी १ ऑक्टोंबरपासून सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.
कोणती सुविधा केली सुरु
पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेमध्ये आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु झाली आहे. PMPML बस मध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता आहे. रविवारी सकाळपासून PMPMLची ऑनलाईन तिकीट सेवा सुरू झाली. UPI QR कोड स्कॅन करून तिकिटांचे पैसे देता येणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अॅपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. आता पुणेकरांना आता पीएमपीएमएलचे तिकीट कॅशलेस पद्धतीने काढता येणार आहे.
आधी घेतली चाचणी
पुणे शहर बसमधील ऑनलाईन तिकीट सेवेची आधी चाचणी घेण्यात आली. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेवेमुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विना कंडक्टर धावणाऱ्या बसेसनंतर आता ऑनलाईन तिकीट प्रणाली पीएमपीएमएलने सुरु केल्यामुळे पुणेकर सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्त फायदा घेणार आहे.




प्रवासी, कंडाक्टर वाद थांबणार
सुट्या पैशांवरुन प्रवाशी आणि कंडाक्टर यांच्यात अनेक वेळा वाद होत असतात. परंतु आता ऑनलाईन तिकीट सुरु झाल्यामुळे हे वाद थांबणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सेवेचे उद्घाटन केले. या सेवेमुळे खिशात पैसे नसताना बसमधून प्रवास करता येणार आहे.