Pune police : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन; विविध गुन्ह्यांतल्या 61 जणांना अटक
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले, ज्याचा उद्देश गुन्हेगारी रेकॉर्ड, पाळत ठेवणारे, बाहेरील, वाँटेड आणि फरार गुन्हेगारांची तपासणी करणे हा आहे.
पुणे : 75व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पुणे शहर पोलिसांनी (Pune city police) मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे शहरातील तब्बल 3,381 हिस्ट्री शीटर्सची तपासणी केली. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये 61 जणांना अटक (Arrested) केली. काही आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, काडतुसे आणि 35 तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी 419 हॉटेल्स आणि लॉज आणि 145 संवेदनशील ठिकाणे यासह रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि शहरातील इतर ठिकाणांची तपासणी केली. कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) दरम्यान पोलिसांनी अवैध दारूच्या अड्ड्यांवरही कारवाई केली. पोलिसांना आणखी आठ जण सापडले ज्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली आहे.
मुद्देमाल जप्त
वाहतूक नियंत्रण शाखेने 1,294 संशयास्पद वाहनांची तपासणी करून त्यांच्या चालकांकडून 1.16 लाख रुपयांचा दंड वसूल केला. एक नाकाबंदी ऑपरेशनदेखील करण्यात आले. या माध्यमातून पोलिसांनी 1,671 लोकांची तपासणी केली. पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत 18 गुन्हे दाखल केले असून 11 गुन्हेगारांना अटक केली आहे. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी 24,829 रुपये किंमतीची 167 लिटर देशी दारू आणि दोन मोबाइल फोन जप्त केले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी एकूण चार गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली.
सार्वजनिक ठिकाणी तपासणी
पोलिसांनी शहरातील 419 हॉटेल्स आणि लॉज, 145 एसटी, बस, ऑटो स्टँडवर शोधमोहीम राबवून पाच पोलीस ठाण्यातून 13 गुन्हेगारांवर कारवाई केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले, ज्याचा उद्देश गुन्हेगारी रेकॉर्ड, पाळत ठेवणारे, बाहेरील, वाँटेड आणि फरार गुन्हेगारांची तपासणी करणे हा आहे. पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथके तयार केली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी कारवाईचे निरीक्षण केले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन भविष्यातही सुरूच राहतील, असे अमिताभ गुप्ता यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे.