चंदन पुजाधिकारी, नाशिक | 9 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणात तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. कारागृहात असताना विविध उपचाराचे नाटक करत तो ससून रुग्णालयात तब्बल नऊ महिने राहिला. त्यानंतर पुणे पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ललित पाटील याच्याशी संबंधित व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले. ललित पाटील याचे हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून तो फरार झाला. फरार झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकात अटक केली. ललित पाटील याला अटक केल्यानंतर त्याला मदत करणाऱ्या १५ पेक्षा जास्त जणांवर पोलिसांनी कारवाई केली. आता तपासाच्या पुढील टप्प्यात ललित पाटील याच्या संपत्तीकडे पोलिसांनी मोर्चा वळवला आहे.
ललित पाटील याने ड्रग्सच्या पैशांतून मोठ्या प्रमाणवर संपत्ती जमा केली. त्याने आठ किलो सोने घेतले होते. त्यातील पाच किलो सोने पोलिसांनी जप्त केले. त्याला सोने विकणाऱ्या सराफावरही कारवाई केली. तसेच ललित पाटील याने फ्लॅट आणि जमिनीत गुंतवणूक केली आहे. मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. या सर्व संपत्तीकडे पोलिसांनी मोर्चा वळवला आहे. त्यासाठी गुरुवारी पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. पुणे पोलिसांनी ललित पाटील याच्या फॉर्च्युनर गाडीसह तीन गाड्या जप्त केल्या आहेत.
ललित पाटील याने नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कुठे मालमत्ता खरेदी केली आहे, त्याचा शोध पुणे पोलिसांचे पथक घेत आहे. ललित पाटील याने ड्रग्सच्या पैशांतून फ्लॅट, प्लॉट आणि इतर मालमत्ता घेतली आहे. त्याची मोजदाद सुरू केली आहे. त्यासाठी नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात पुणे पोलिसांचे पथक तळ ठोकून आहे. ललित पाटील याने स्वत:च्या, कुटुंबियांच्या आणि प्रेयसीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे.