Pune : बिबवेवाडीतल्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या, MCOCA कायद्यानुसार गुन्हा दाखल
पुण्याचे पोलीस आयुक्त (Pune police commissioner) अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी 12 गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका (MCOCA Act.) कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : शहरात कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या (Organised crime gangs) आणि गटांवर कारवाई सुरू ठेवत, पुण्याचे पोलीस आयुक्त (Pune police commissioner) अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी 12 गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका (MCOCA Act.) कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरातील बिबवेवाडी, सुखसागर नगर, कात्रज, पर्वती, दत्तवाडी, जनता वसाहत, वडगावधायरी भागात ही टोळी कार्यरत होती. गणेश बबन जगदाळे, गौरव बसंत बुगे, शुभम प्रकाश रोकडे, रोहित विजय अवचारे, रोहन राजू लोंढे, सौरभ दत्तू सरवदे, आकाश सूरजनाथ सहानी, ऋषिकेश विठ्ठल साळुंके, अनिस फारुक सय्यद, आकाश सुरेश शिळीमकर, आदित्य संजय नलावडे, अजय कालिदास आखाडे आणि कुणाल रविदास गायकवाड अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. चालू वर्षात पोलीस आयुक्त गुप्ता यांनी कारवाई सुरू केल्यापासून MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली ही 11वी टोळी आहे.
दहशत पसरवण्याचा प्रयत्न
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पुण्याचे CP म्हणून पदभार स्वीकारल्यापासून शहरात दाखल झालेला 74वा MCOCA गुन्हा आहे. एफआयआरनुसार, टोळी प्रमुख जगदीश जगदाळे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांवर दोन राऊंड गोळीबार केला आणि उपनगरात भीती आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या टोळीच्या सदस्यांकडे धोकादायक शस्त्रे असून ते शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत होते, असे पोलिसांनी सांगितले.
‘संघटित गुन्हेगारीबद्दल शून्य सहनशीलता’
बिबवेवाडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी गुंडांवर धोकादायक कारवाया आणि कृत्ये रोखण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि त्यानुसार पोलीस उच्चपदस्थांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. दरम्यान, अमिताभ गुप्ता म्हणाले, की आमच्याकडे संघटित गुन्हेगारीबद्दल शून्य सहनशीलता आहे आणि पुण्यातील नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत.