पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. गणेशोत्सवाची नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत. सध्या आॅनलाईन (Online) पध्दतीने गणेश मंडळांना नोंदणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलायंत. गणेशोत्सवात मंडळांकडून विविध प्रकारचे देखावे तयार केले जातात. मात्र, यंदा गणेशोत्सवात अफजल खानाच्या वधाचा देखावा नको, असे पुणे पोलिसांकडून (Pune Police) सांगण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झालायं.
गणेशोत्सवात अफजल खानाच्या वधाचा देखावा केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण बघायला मिळते आहे. मात्र, पुण्यातील एक गणेश मंडळ अफजल खानाच्या वधाचा देखावा करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असून पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आम्ही देखावा करणारच असल्याचे गणेश मंडळाचे म्हणणे आहे.
संगम तरुण मंडळाने अफजल खानच्या वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे परवानगी मागितली होती. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी परवानगी या देखाव्यासाठी नाकारलीयं. मात्र परवानगी नाकारली तरी देखावा सादर करण्यावर मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे ठाम आहेत. याप्रकरणी गणेश मंडळ थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. आता यावर पुढे पुणे पोलिस नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.