पत्रकार परिषदेत खोचक आणि नेमकं बोलायला कसं सुचतं?; राऊतांनी मोजक्या शब्दात सांगितलं…
Sanjay Raut on Press Conference and Nitish Kumar Rejoin NDA : 2024 नंतर नितेश कुमार राजकारणात नसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच ठाकरे गटाच्या 2024 च्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा अजेंडा काय? रणनिती काय असेल? यावर राऊत बोलले आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 29 जानेवारी 2024 : पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न संजय राऊतांना विचारले. या प्रश्नांची राऊतांनी सविस्तर उत्तरं दिली. रोज सकाळी संजय राऊत माध्यमांशी संवाद साधतात. याबाबत अंधारे यांनी राऊतांना बोलतं केलं. तुम्ही दररोज पत्रकार परिषद घेता. यावेळी विरोधकांवर तुम्ही नेमक्या शब्दात टीका करता, हे तुम्हाला कसं सुचतं? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं.
हे सारं येतं कुठून?
आपण जे बोलता त्याने दिवसभराचा पत्रकारांचा अजेंडा सेट होतो. रोज पत्रकार परिषद घेण्याची कल्पना कुठून येते?, असा प्रश्न अंधारेंनी विचारला. त्यावर मी कधीच पत्रकार परिषद घेत नाही. पत्रकार माझ्या घराखाली येतात. मी कधीच पत्रकारांना फोन केला नाही की, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पत्रकार मला प्रश्न विचारतात हे शिवसेनेचं यश आहे. संजय राऊत नावाचं बिट आहे, ही शिवसेनेची ताकत आहे. माझ्या अग्रलेखाची सुद्धा बातमी होते, हे बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीचं फळ आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
नीतीश कुमार यांच्यावर निशाणा
जेडीयूचे नेते नीतीश कुमार यांनी पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. मुळात नितेश कुमार ही फार मोठी ताकत आहेत, असं मी कधीच मानत नाही. ते फक्त बिहारचे नेते आहेत. गेल्या 4 वर्षात त्यांनी 4 वेळा निर्णय बदलला आहे. बिहारमध्ये फक्त विरोधी पक्ष बदलतो. सत्तेत तोच पक्ष राहतो. कालच्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त वस्त्राहरण भाजपचं झालं आहे, असं राऊत म्हणाले.
नीतीश कुमार यांच मानसिक स्वास्थ बिघडल आहे आम्हाला ते जाणवत होतं. नीतीश कुमार यांनी निर्णय घेतला म्हणजे बिहार हातातून गेलं असं नाही उलट तिथे तेजस्वी यादव यांची ताकत वाढेल. बिहार राजकीय दृष्ट्या खूप प्रगल्भ आणि मोठे राज्य आहे. लोकांनी नीतीश कुमार सारख्या नेत्यांना अडगळीत टाकलं आहे 2024 नंतर नीतीश कुमार राजकारणात नसतील हे मी आज सांगतो, असंही संजय राऊत म्हणाले.