Ajit Pawar | अजित पवार यांचा मुलगा पार्थसाठी कोणता शोधला मतदार संघ
ajit pawar and parth pawar | सध्या सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली गेली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी मतदार संघ शोधला आहे.
पुणे | 15 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीला आता काही महिने शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. अंतर्गत सर्व्हे केले जात आहेत. कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार असणार? यावर पक्षात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात दोन गट पडले. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मतदार संघही शोधण्यात आला.
पवार कुटुंबियामध्ये लढत होणार का?
पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघ आहे. पुणे, बारामती आणि शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला कोणता मतदार संघ येणार आहे, त्यावर चर्चा सुरु झाली आहे. महायुतीत बारामती किंवा शिरुर लोकसभा मतदार संघ अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे २००९ पासून सातत्याने निवडून येत आहे. १९९६ पासून २००४ पर्यंत शरद पवार यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. आता या ठिकाणी पार्थ पवार उभे राहिल्यास सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांना थेट लढत द्यावी लागणार आहे.
पार्थ पवार यांच्यासाठी काढला हा मार्ग
पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार गटाने मधला मार्ग काढला आहे. बारामतीमधून सरळ सुप्रिया सुळे यांच्याशी लढत केल्यास एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांची ती लढत होणार आहे. त्याऐवजी पार्थ पवार यांना शिरुर मतदार संघातून उभे करण्याची तयारी चालवली जात आहे. शिरुर मतदार संघावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या मतदार संघात शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
हे आमदार अजित पवार यांच्यासोबत
शिरूर लोकसभा मतदार संघात आंबेगाव, खेड, हडपसर, जुन्नर आणि भोसरी मतदार संघ येतात. शिरुरचे आमदार अशोक पवार याच मतदार संघातील आहेत. फक्त ते अजित पवार यांच्यासोबत नाही. परंतु दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते-पाटील, चेतन तुपे, अतुल बेनके हे अजित पवार समर्थक आहे. यामुळे शिरुर मतदार संघ पार्थ पवार यांच्यासाठी सुरक्षित असणार आहे.