Pune Supriya Sule : रेकॉर्डब्रेक जीएसटी कलेक्शन झालं तर मग पैसा तुमच्याकडे का ठेवला? महागाईप्रश्नी पुण्यात सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला सवाल
आरबीआयने व्याजदर वाढवले. त्याच्याबद्दलही आम्ही एक ते दीड महिन्यांपासून सांगत होतो. आम्हाला हे दिसत होते. केंद्र सरकारला आणि अर्थमंत्रालयाला हे दिसत कसे नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
पुणे : मी सातत्याने संसदेत सांगत होते, की महागाई वाढत आहे. पण आपण त्यावर चर्चा करायला हवी होती. ती केली नाही आणि आज महागाई प्रचंड वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी केली. त्या पुण्यात (Pune Supriya Sule) बोलत होत्या. राष्ट्रवादी पक्षातर्फे शनिपार चौकात महागाईविरोधात आंदोलन (NCP Agitation) करण्यात आले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, की केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी (GST) कलेक्शन झाल आहे. तर मग पैसे कशाला तुमच्यापाशी ठेवलेत, असा सवाल त्यांनी केला. तर महागाई कमी करण्यासाठी सबसीडी द्या. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारने महागाईचा प्रश्न सोडवायला हवा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्यात, विभागात, तालुक्यात जाणार
आरबीआयने व्याजदर वाढवले. त्याच्याबद्दलही आम्ही एक ते दीड महिन्यांपासून सांगत होतो. आम्हाला हे दिसत होते. केंद्र सरकारला आणि अर्थमंत्रालयाला हे दिसत कसे नाही, असा सवाल त्यांनी केला. तर सर्वसामान्य महागाईमुळे बेजार झाला असून त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते करणार, अशी ग्वाही त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने दिली. हे आंदोलन एवढ्यावरच थांबणार नसून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, विभागात, तालुक्यात जाणार आणि महागाईच्या मुद्द्यावर आवाज उठवणार, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिपार चौकातील मारुती मंदिरासमोर हे आंदोलन केले. यावेळी भाजपाचा झेंडा उलटा लावत कमळाबाई, महागाईची देवी अशा आरत्या करण्यात आल्या. भष्टाचाराचा निषेधही करण्यात आला. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. याआधीही राष्ट्रवादीने गुडलक चौकात 29 एप्रिलला आंदोलन केले होते. यात भोंगे लावून, नरेंद्र मोदींचे जुने भाषण ऐकवण्यात आले होते. महागाई तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला होता.