Pune Vasant More : माझ्या प्रभागात भोंग्याविना नमाज, फेसबुक पोस्ट करत वसंत मोरेंनी मानले सर्व मुस्लीम बांधवांचे आभार
मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो. त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आहे. आजची नमाज त्यांनी भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले, म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार मानतो, असे वसंत मोरे म्हणाले.
पुणे : पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजी येथे आहे. प्रभागातील मशिदींच्या प्रमुखांसोबत बोललो आहे. सर्वांनी सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटले आहे. एक फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका मांडली होती. मात्र पुण्यातील मनसेचे नेते आणि मनसे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या भूमिकेविरोधात मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आले होते. त्यावेळी ते पक्ष सोडण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मोरे यांनीच या सर्वांवर पडदा टाकत आपण पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी ते फारसे दिसले नाहीत. मात्र आता फेसबुक (Facebook) पोस्टद्वारे आपण तिरुपती बालाजीला असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार’
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाही, तर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो. त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आहे. आजची नमाज त्यांनी भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले, म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार…
काय भूमिका मांडली होती?
पुण्यातील माझ्या प्रभागात मुस्लीम मतदार अधिक आहेत. त्यांनी आतापर्यंत साथ दिली आहे. त्यामुळे त्यांना दुखावणार नाही. माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. त्यामुळे मी भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. त्यानंतर मनसेतील वाद चव्हाट्यावर आला होता. नंतर राज ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली होती. दरम्यान, कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या प्रभागातला मुस्लीम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठीशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मते आहेत आणि हीच मते गेमचेंजर ठरतात.