पुणे, नाशिक प्रवास आता सुसाट, दोन्ही शहराचे अंतर पावणेदोन तासांवर येणार
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत
पुणे : पुणे-नाशिककरांसाठी दिल्लीतून मोठी बातमी आली आहे. आता लवकरच पावणेदोन तासांत नाशिकहून थेट पुण्याला (Nashik) आणि पुण्याहून नाशिकला पोहचता येणार आहे. यासाठी नाशिक-पुणे (Pune) सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला (railway) रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली. या प्रकल्पात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करुन पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्यापुढे त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पाला मान्यता मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत ही माहिती दिली.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे मत देखील व्यक्त केले आहे.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे संदर्भात सुधारित आराखड्याचे सादरीकरण आज झाले आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली. तांत्रिक बाबींची पूर्तता करून आता केंद्रीय मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर होईल.
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद (5 फेब्रुवारी 2023) pic.twitter.com/rAlMrzpwdG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2023
अनेक वर्षांपासून पाठपुरावा
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी प्रयत्न केले होते. अखेरी आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा प्रयत्न केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली. आता सेमी हास्पीड रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक १ हजार ४५० हेक्टरपैकी ३० हेक्टरपेक्षा अधिक खासगी जमीन संपादीत केली गेली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही माहिती देण्यात आली. प्रकल्पासाठी सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
आतापर्यंत फक्त रस्तेमार्गच होता
पुणे – नाशिक दरम्यान आतापर्यंत फक्त रस्ते प्रवासाचा मार्ग होता. परंतु आता थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे सुमारे सहा तासांचा हा प्रवास पावणे दोन तासांवर येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प अंमलात आणणार असल्यामुळे वेळ वाचणार असून दोन्ही शहरांचा विकास अधिक वेगाने होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा आहे.
कसा असणार मार्ग
- राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प
- रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर लांबीचा असणार
- पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना हा प्रकल्प जोडणार
- २०० किलोमीटर प्रतितास वेगाने सेमी हायस्पीड रेल्वे धावणार
- पुणे ते नाशिक हे २३५ किलो मीटरचे अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापता येणार
- पुणे – नाशिकदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित
- भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार
- पुणे ते मांजरी एलिव्हेटेड म्हणजेच पुलावरुन ही रेल्वे धावणार
- मांजरी ते नाशिक जमिनीवरून हायस्पीड रेल्वे धावणार