Rain : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार? कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
weather update and rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील १२ दिवस राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे | 3 ऑगस्ट 2023 : राज्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पाऊस सक्रीय होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कुठे कोणता अलर्ट
हवामान विभागाने राज्यात चार, पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड आणि रत्नागिरीसोबत पालघर जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच मराठवाड्यासही यलो अलर्ट दिला आहे.
अमरावतीत मोठे नुकसान
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात 67 हजारापेक्षा अधिक एकरातील पिके पाण्याखाली गेली आहे. अमरावती जिल्ह्यात 321 गावातील 649 घरांची पडझड झाली आहे. 1 हजार 678 व्यक्तींना पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या काळात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस तूर सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोयना धरणात 78.22 टीएमसी जलसाठा
कोयना धरणाचा जलसाठा 78.22 टीएमसी झाला आहे. आता कोयना धरणातून एकूण 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणात 30 हजार 395 क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असताना मराठवाड्यात दोन महिन्यांत फक्त 49 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. पैठणमधील जायकवाडी धरणात फक्त 32 टक्के पाणीसाठा आला. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांसह 107 मध्यम आणि 749 लघू प्रकल्पांची जल पातळी कमी झाली आहे.
गोंदियात पावसाला सुरुवात
गोंदिया जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून पावसाची रिप रिप सुरू झाली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात दोन लाख 10 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पीक विमा काढणाऱ्यात मागील वर्षीच्या तुलनेत पाच पट वाढ झाली आहे.