AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | राज्यात या तारखेपासून पाऊस करणार ‘टाटा’, सध्या काय आहे पावसाचे अपडेट

Rain Update | महाराष्ट्रात उशिराने दाखल झालेला मान्सून परतीचा प्रवासही उशिरानेच सुरु करणार आहे. देशातील बहुतांशी भागांत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यात कधीपासून पाऊस परतणार त्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Rain Update | राज्यात या तारखेपासून पाऊस करणार 'टाटा', सध्या काय आहे पावसाचे अपडेट
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 8:02 AM

पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : देशभरात यंदा मान्सून उशिरानेच दाखल झाला. केरळमध्ये उशिराने आलेला मान्सून कोकणात १० जून रोजी आला. परंतु राज्यात २५ जूनपर्यंत पोहचला. त्यानंतर जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलै महिन्यात पाऊस बऱ्यापैकी झाला. परंतु जून महिन्याचे तीन आठवडे पाऊसच नव्हता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही तब्बल २१ दिवस पावसाचा खंड होता. यामुळे राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. मान्सूनचा हंगाम संपला असून आता परतीचा पाऊस देशभरात सुरु झाला आहे. राज्यात कधीपासून पाऊस परतणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

देशभरात मान्सूनचा परतीचा प्रवास

मान्सूनचा परतीचा प्रवास देशात राजस्थानपासून सुरु होता. यंदा राजस्थानमधून परतीचा पाऊस उशिरानेच सुरु झाला. दरवर्षी १७ सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सून परतण्यास सुरुवात होते. यंदा २५ सप्टेंबरपासून मान्सून परतला. आता राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागांतून मान्सून परतला आहे. महाराष्ट्रातून तीन दिवसांत मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून १० ऑक्टोंबरपर्यंत मान्सून परतणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्यपी यांनी सांगितले.

राज्यात सध्या काय आहे परिस्थिती

राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. रत्नागिरी- कोकणात आता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी बाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने पावसाचा कोणताच इशारा दिलेला नाही. तसेच कुठे ऑरेंज अलर्ट दिलेला नाही. राज्यात अजून अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

विदर्भात पावसाने सरासरी गाठली आहे. परंतु मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. बीडमध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना आधार मिळाला. परंतु जिल्ह्यातील धरणांमध्ये अजूनही साठा झालेला नाही. यामुळे रब्बी हंगामही कसा असणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. माजलगाव धरणातून बीडला पाणीपुरवठा होतो. मात्र माजलगाव धरणातील पाणीसाठा कमी असल्याने बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट कायम आहे.