पुणे येथील ही मेगा भरती का रखडली, प्रशासनाकडून कारवाई पूर्ण पण…
Pune Mega Bharti : पुणे जिल्ह्यासाठी मोठी भरती होणार होती. त्यासाठी या महिन्यात जाहिरात येणार होती. प्रशासनाकडून प्रक्रिया पूर्ण केली गेली. परंतु ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
रणजित जाधव, पुणे | 17 जुलै 2023 : पुणे जिल्ह्यासाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. तब्बल एक हजार जागांची ही भरती होती. त्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्या कंपनीकडून अजूनही पुढील प्रक्रिया सुरु झाली नाही. यामुळे पुणे येथील ही भरती प्रक्रिया रखडणार आहे. यामुळे सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या युवक, युवतींना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
कुठे होणार होती भरती
पुणे जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेने भरतीसाठी आवश्यक माहिती मे महिन्यात तयार केली. त्यासाठी नियुक्त केलेल्या आयबीपीएस कंपनीकडे ही माहिती पाठवली. परंतु या भरती प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयबीपीएस कंपनीने अद्याप डेमो लिंक पुणे जिल्हा परिषदेला पाठवली नाही. यामुळे होणाऱ्या भरतीसाठीची जाहिरात कधी प्रसारित होणार? याबाबत अनिश्चित वाढले आहे.
सध्या किती जागा आहेत रिक्त
पुणे जिल्हा परिषदेत सध्या एक हजार जागा रिक्त आहेत. त्यात कनिष्ठ अभियंता (३३), स्थापत्य अभियंत्रिकी सहायक (५९), कंत्राटी ग्रामसेवक (३७), आरोग्य सेवक महिला (४३६), आरोग्य सेवक १२८, औषध निर्माण अधिकारी २५ यासह विविध जागा होत्या. परंतु ही प्रक्रिया थांबली आहे. या विलंबामुळे पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची संख्या वाढणार आहे.
आयबीपीएसकडे काम
राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेचे काम आयबीपीएस कंपनीकडे दिले आहे. त्यासाठी या कंपनीने सॉफ्टवेअर प्रणाली तयार केली आहे. मात्र त्यासाठी डेमो लिंक तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याची सरकारची घोषणा पूर्ण होणार नाही.
जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून रखडली आहे. ही प्रक्रिया लवकर करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्यास सहा महिने झाले आहे तरी अद्याप भरती सुरु झाली नाही.