पुतण्याचा सरळ काकांवर हल्लाबोल, रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर साधला निशाणा
ajit pawar and rohit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर काका-पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी अजित पवार आणि पुतणे रोहित पवार यांची चर्चा होते. रोहित पवार यांनी आता सरळ काकांवर हल्ला केलाय...
पुणे | 12 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जुलै महिन्यात बंड केला. या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पक्षात निर्माण झाले. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाची कोंडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. एकीकडे अजित पवार यांच्या गटातील २४ आमदारांना अपात्र करण्याची कारवाई सुरु आहे तर दुसरीकडे शरद पवार स्वत: राज्यभरात सभा घेत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार उत्तर सभा घेत आहे. राष्ट्रवादीतील राजकारण असे सुरु असताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरकडे जात होते. यावेळी त्यांना डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात शासकीय नोकरभरती खासगी कंपनीऐवजी शासनामार्फत करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, शासकीय कर्मचार्यांच्या वेतनावर मोठा खर्च होते. एका शासकीय कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे. या अर्थसंकल्पापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
रोहित पवार यांनी साधला निशाणा
रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता X (पूर्वीचे टि्वटर) टि्वट केले आहे. त्यात म्हटले आहे की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे वक्तव्य राज्यातील एका बड्या नेत्याने केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांची बदललेली भूमिका दिसते. त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. हाच फार्मूला एका आमदारावर, खासदारावर लावला तर करोडो रुपयांच्या खर्चात हजारो शासकीय कर्मचारी काम करतील.
विद्यार्थ्यांकडून हजारो कोटींची वसूली
शासनाकडून सरकारी नोकरभरतीत विद्यार्थ्यांकडून हजारो कोटींची वसूली केली जात आहे. याबद्दल रोहित पवार यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, परीक्षा शुल्काच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली सरकार करत आहेत. त्यानंतर त्या परीक्षा पारदर्शक झालेल्या नाहीत. सरकार खासगी कंपन्यांना फायदा देण्यासाठी कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत.