Rupali Chakankar : मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण यात महिलांचा सहभाग नाही हे दुर्दैव; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली नाराजी
महिलांच्या सुरक्षितेबरोबरच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घ्यावी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी या मंत्रिमंडळाने घ्यावी, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
खेड, पुणे : आता मंत्रिमंडळ स्थापन झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. पण या मंत्रिमंडळामध्ये महिलांचा सहभाग नाही, हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. त्या राजगुरूनगर येथील प्रेरणा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होत्या. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) अखेर आज झाला. यावेळी विविध जिल्ह्यांतील भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एकूण 18 जणांचा शपथविधी सोहळा झाला. मात्र यात एकही महिला मंत्री नसल्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना त्याची जबाबदारी आणि महिलांची सुरक्षितता (Women’s security) या गोष्टी समोर ठेवून महिलांना स्थान द्यायला हवे होते, अशी गरज चाकणकर यांनी व्यक्त केली.
‘एकीकडे अभिमान आणि दुसरीकडे…’
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका आदिवासी समाजामधून सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संविधानिक पदाची शपथ घेतात, तेव्हा महिला भगिनींना निश्चितच अभिमान वाटतो. पण दुसरीकडे आज मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये निश्चितपणाने स्थान दिले गेले पाहिजे आणि याचा विचार या मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य क्रमाने विचार करणे फार गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
‘खबरदारी घ्यावी’
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशावेळी महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी निश्चितपणाने सरकारने घ्यावी. महिलांच्या सुरक्षितेबरोबरच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घ्यावी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी या मंत्रिमंडळाने घ्यावी, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. कार्यक्रमप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील, प्रेरणा सोशल फाऊंडेशनच्या अक्षता कान्हूरकर यावेळी उपस्थित होत्या.