“भारतमाता विधवा की सधवा ठरवणारे तुम्ही कोण?”, रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना सवाल
रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना सवाल...
पुणे : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) मुलींना टिकली लावण्याचा आग्रह धरतात. त्यांना मला सांगायचंय की, ज्या सावित्रीमाई आडवं कुंकू लावत होत्या डोक्यावरून पदर घेत होत्या. त्यांनाही तुम्ही त्रास दिला. या सनातनी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि इथून पुढेही राहील.जिजाऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांचं योगदान काहीच नाही का ? भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण ?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संभाजी भिडे यांना विचारला आहे.
विधवांचा सन्मान करण्यासाठी आम्ही हळदीकुंकू सोहळा करतो. मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध आहे, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले वाड्यात स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त यंदाचा समता पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना देण्यात आला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी एक महिला गेली होती.तेव्हा तू टिकली लावलेली नाही, म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असं संभाजी भिडे म्हणाले होते.संभाजी भिडे यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला. महिलांच्या आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आता रुपाली चाकणकर यांनीही आज आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या सत्यवानाच्या सावित्रीला आम्ही पाहिलं नाही. तिला आम्ही मानतो आणि पुढे घेऊन जातो आणि बंधनात बांधून घेतो. पण सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा ज्योतिबांची सावित्री आम्हाला जास्त प्रिय आहे, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.