विधानसभा निवडणूक लढण्याबाबत रूपाली चाकणकरांनी दिली हिंट; म्हणाल्या, सुनेत्रा पवारांना…
Rupali Chakankar on Vidhansabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. विधानसभा लढण्याचे संकेत रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघावर त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्राला वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे… राज्याच्या राजकीय वर्तुळापासून ते गावच्या पारावर विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे. अशात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार याची चर्चा होतेय. पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विधानसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली.
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?
2019 मध्ये मी खडकवासला मधून मी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं. लोकसभेत खडकवासला मधून मताधिक्य आहे. माझ्या मतदारसंघातून सुद्धा सुनेत्रा पवार यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण तरिही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत चालली आहेत. या वारीत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांवर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आरोग्यवारी अभियानाचे उपक्रम राबवण्यात आला आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोयीसुविधा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलं जातं, असं त्या म्हणाल्या.
आव्हाडांच्या विधानावर प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहीण योजना या योजनेवर दिलेल्या प्रतिक्रियेवर रूपाली चाकणकरांनी भाष्य केलंय. जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना निवडणुकीत बाजूला ठेवलं होतं. त्यांच्या वक्तवल्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे, असं चाकणकर म्हणाल्यात.
अधिवेशनात विरोधी पक्ष स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी असं विधान करत असतात. भाजप अजित दादांना दूर करणार नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.