Rupali Chakankar | ‘सोबत असताना किंमत कळत नाही, आणि…’, रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं?
रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांवर खोचक टोला लगावला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्याकडून उत्तर देण्यात आलंय.
योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला होता. “तीन महिन्यात तुमचं हनिमून संपायच्या आत नाराजी सुरू झाली”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि शिंदे सरकारला लगावला होता. आता त्यांच्या टीकेला अजित पवार यांच्या गटाकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. चाकणकर यांनी ट्विटरवर सुप्रिया यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधलाय.
“राज्यात ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यावरून राज्यात शासन आहे असे वाटत नाही. तीन महिन्यापासून सरकारचे काम बंद आहे. तीन इंजिनमधील एक घटक फडणवीस यांना भेटायला गेला, असं मी ऐकलं. तीन महिन्यात तुमचं हनिमून संपायच्या आत नाराजी सुरू झाली”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्याला आता रुपाली चाकणकरांकडून प्रत्युत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे.
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
“एखादी व्यक्ती आपल्या सोबत असली की त्याची किंमत कळत नाही. पण ती व्यक्ती आपल्यातून दूर निघून गेली की त्याचं असणं आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या राजकीय भवितव्यासाठी किंवा एखाद्या पुरस्कारासाठी किती महत्वाचं असतं, हे प्रकर्षाने जाणवतं. काही जणांच्या मनाची अवस्था अगदी अशीच झाली आहे”, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
“सोबत असताना कधी नाराजीची जाणीव झाली नाही. पण आता ती व्यक्ती आपल्यासोबत नसल्यावर अर्धवट माहितीच्या आधारावर कोणत्यातरी ‘सूत्रांच्या’ हवाल्याने वक्तव्य. हे खरं म्हणजे प्रचंड आगतिकतेची आपण शिकार झाला आहात याची मनोमन खात्री पटते”, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.