वसंत मोरे यांची ‘ती’ पोस्ट आणि संभाजीराजे यांचा थेट वसंत मोरे यांना फोन
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून त्यांना फोन केला. यावेळी त्यांनी वसंत मोरे यांची समजूत काढली आहे. त्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांची पोस्ट पाहून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडून आलाय. विरोधी बाकावर बसणारे विरोधी पक्षनेते अजित पवार हेच आता सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनाही हा धक्का बसला आहे. त्यातून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. पण ती पोस्ट वाचल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना फोन केला.
वसंत मोरे यांनी नेमकी काय पोस्ट केली होती?
वसंत मोरे यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट राजकारण सोडावं आणि शेती करावी, असं वाटत असल्याचं म्हटलं होतं. “पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव. लांब कुठंतरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय”, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली होती.
वसंत मोरे यांची पोस्ट पाहताच संभाजीराजे छत्रपतींनी वसंत मोरे यांना फोन केला. “तुम्ही असे काही करणार नाही. तुमच्यासारखी लोक राजकारणात अॅक्टिव्ह पाहिजेत”, असा गोड दम संभाजीराजेंकडून वसंत मोरे यांना देण्यात आला. तसेच “तुम्ही स्ट्राँग राहा”, असा सल्ला संभाजीराजेंनी वसंत मोरे यांना दिला. वसंत मोरे आणि संभाजीराजे यांचं फोनवरील संभाषण सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतंय.
संभाजीराजे आणि वसंत मोरे यांचं संभाषण
संभाजीराजे छत्रपती : हॅलो!
वसंत मोरे : राजे नमस्ते!
संभाजीराजे छत्रपती : हो, नमस्कार, नमस्कार… तुमची पोस्ट मला दाखवली धनंजयनी, तुम्ही ट्विट केली होती.
वसंत मोरे : हो, हो…
संभाजीराजे छत्रपती : असलं काय करायंचं नाही ते,सांगतोय. कितीही मनाला पटलं नाही तरी तुमच्यासारखी लोक एकदम सोशअली अॅक्टिव्ह पहिजे. राजकीय, पॉलिटीकल ऑक्टिव्ह पाहिजे.
वसंत मोरे : बरोबर आहे महाराज, पण काय आता हे असं बघितलं की थोडं जरा…
संभाजीराजे छत्रपती : नाही मग काय? तुम्हाला वाटतंय आम्हाला बरं वाटायलंय सगळं जे काय चाललंय? आपण उलटं स्ट्राँग राहिलं पाहिजे. जिथे असाल तुम्ही तिथे असाल. पण तिथं तुम्ही स्ट्राँग राहिलं पाहिजे.