PM Modi Dehu Visit : तीन नाही तर एकच दिवस बंद राहणार देहूतलं तुकाराम महाराज मंदिर; दर्शनासाठी स्क्रीनही लावला जाणार
राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख दर्शन आणि कळसाच्या दर्शनाची मंदिराबाहेर स्क्रीनवर (Screen) सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.
देहू, पुणे : देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिर (Sant Tukaram Maharaj Mandir) तीन दिवस बंदच्या निर्णयात थोडासा बदल करण्यात आला आहे. मंदिर तीन दिवस बंद न राहता फक्त ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंदिरात लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत, त्या दिवशी संपूर्ण मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. मुख्य कार्यक्रम झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. तर इतर दिवशी स्वच्छतेसाठी एक किंवा दोन तास मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहील. राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख दर्शन आणि कळसाच्या दर्शनाची मंदिराबाहेर स्क्रीनवर (Screen) सोय करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. तसेच त्यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. 14 तारखेच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी येणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह यावेळी भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पोस्टरवरून राष्ट्रवादीची टीका
या कार्यक्रमाला पंतप्रधान येणार असल्याने मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, या पोस्टरबाजीवरून वादंगही सुरू झाला आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रवीकांत वरपे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे कार्यक्रमाआधीच आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाला सुरुवात झाली आहे.