शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर; म्हणाले, शरद पवारांसोबत…
Sharad Pawar and Chetan Tupe : शरद पवार हे आज पुण्यातील एका कार्यक्रमाला हजर होते. यावेळी अजित पवार गटाचे आमदारही उपस्थित होते. यावेळी या दोघांमध्ये काय बोलणं झालं? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यात सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने ‘गोल्डन जुलै’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे देखील उपस्थित होते.
शरद पवार-चेतन तुपे एका मंचावर
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि चेतन तुपे पहिल्यांदाच एका मंचावर दिसले. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ‘गोल्डन जुलै’ कार्यक्रमात हे दोन नेते एका मंचावर होते. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडीत पार पडला. शरद पवार आणि चेतन तुपे एका मंचावर आल्याने चर्चांना उधाण आलंय.
चेतन तुपेंची प्रतिक्रिया
राजकीय वर्तुळातील चर्चांच्या पार्श्वभूमीवर चेतन तुपे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘गोल्डन जुलै’ हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो. यावेळी शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षाने एमएलए निमंत्रण दिलं होतं. मी हडपसरचा आमदार आहे. या वनवडी परिसरात हा कार्यक्रम असल्याने मी हजर होतो, असं चेतन तुपे म्हणाले.
शरद पवार भाषणात काय म्हणाले?
सातारा आणि सातारा जिल्ह्याचा इतिहास सांगायला बराच वेळ लागेल. कारण महाराष्ट्र राज्यासाठी साताऱ्याने अनेक त्याग केले. महाराष्ट्र आणि देशाचा स्वतंत्र लढा झाला आणि यात अनेक लोक सातारा जिल्ह्यातील होते. याची फार मोठी जागा सातारकारांनी घेतली. सातारा जिल्ह्याने अनेक अधिकारी, अनेक लोकप्रतिनिधी दिले. राज्याचे पाहिले मुख्यमंत्री देखील सातारा जिल्हयाचे होते. इंग्रजांच्या काळात सातारकरांनी त्यांना विरोधाची भूमिका दाखवली. माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केली. त्यामुळे केवळ तुम्ही नाही तर मी पण सातारकर आहे, असं शरद पवार म्हणाले.