Sharad Pawar : शरद पवार महायुतीच्या नाकात दम आणणार? सर्वाधिक इन्कमिंग पवारांकडे; आता हा नेता भेटला; काय घडणार?
Sharad Pawar Mahayuti : नवीन नेतृत्वाला संधी मिळत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीत उभी फुट पडली. आता शरद पवार यांनी मार्गदर्शक राहावे असा सूर आळवण्यात आला. थोरल्या पवारांनी दाखवलेल्या चमत्काराने महायुतीच्या नाकात दम आणला आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीत काहीच आलबेल नसल्याचे समोर आले होते. या पक्षाला खिंडार पाडायला नंतर बरीच महिने खर्ची पडली. महायुतीत राष्ट्रवादी सहभागी झाली. त्यावेळी शरद पवार यांनी मार्गदर्शक व्हावे आणि नवीन नेतृत्वाला संधी द्यावी असा सूर आळवण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली. वेगवान घडामोडी घडल्या. लोकसभेत मात्र महाविकास आघाडीने महायुतीला आस्मान दाखवले आणि कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये विश्वास जागवला. तरुणांना लाजवेल अशा उत्साहात पवारांनी जराही उसंत न घेता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक इन्कमिंग होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नेत्याने पण शरद पवार यांची भेट घेतली आहे.
सत्यशील शेरकर तुतारी हाती घेणार
सत्यशील शेरकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. जुन्नर मतदारसंघातून शेरकर इच्छुक आहेत. शेरकर सध्या काँग्रेसमध्ये आहेत मात्र जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. अतुल बेनके यांना शेरकर यांचे आव्हान असेल.
खासदार अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली. जुन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत कोल्हे यांना भेटण्यासाठी आलो होतो. सुप्रिया सुळे, शरद पवार यांची ही भेट घेतली. त्यांना ही याबाबत मी बोललो. मुलाखती होण्याचा आणि माझा येण्याचा योगायोग आहे. इच्छुक आहेच. मी मुलाखत दिलेली नाही. माझी तयारी ही महाविकास आघाडीतून आहे. महाविकास आघाडीने निर्णय घेतल्यास मी कुठल्याही पक्षातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्नरचा तिढा वाढणार की सुटणार?
जुन्नर विधानसभेच्या जागेचा तिढा वाढण्याची चिन्ह आहेत. जुन्नरच्या जागेवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंचे समर्थक आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि आदिवासी, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी शरद पवारांची भेट घेऊन जुन्नरच्या जागेवर बेनकेंना उमेदवारी द्यावी अशी साद घातली आहे. बेनके आणि पवार कुटुंबाचा ऋणानुबंध जपला जावा अशीही विनंती त्यांनी केली आहे.