Sharad Pawar : महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या बरखास्तीशी संबंध नाही; शरद पवारांनी आरोप फेटाळले
अलिकडे कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी बोलून सांगितलं होते, असे शरद पवार म्हणाले.
पुणे : महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Council) बरखास्तीशी संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीव्ही 9सोबतच्या एक्सक्लुसिव्ह बातचीतमध्ये आपले मत व्यक्त केले. ते इंदापुरात बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून अध्यक्ष आहे. मी क्रिकेटचा (Cricket) अध्यक्ष होतो. देशाचा, मुंबईचा आणि जगाचाही होतो. खेळाच्या संघटनेत खेळाच्या निवडीत मी लक्ष घालत नसे. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे, हे मी करत होतो. त्यांना काही अडचणी आल्या, शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो, असे ते म्हणाले.
‘कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी’
या सर्व बाबींना कुस्तगीर परिषदही अपवाद नाही. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करणे, स्पर्धांना आर्थिक मदत देण्याचे काम करणे, आदी गोष्टी करण्यास मी प्राधान्य देत होतो. अलिकडे कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी बोलून सांगितलं होते. मी त्यांना सुधारणा करण्यास सांगितले. ज्यांच्या तक्रारी आल्या, त्यातील पुण्यातील काका पवार राज्यातील हिंद केसरी आहेत. ते आजही अनेक तरुणांना तयार करतात. त्यांच्या तालमीत 80 ते 90 मुले ते तयार करत असतात. आम्ही या तरुणांना मदत करत असतो. राष्ट्रीय पातळीवर यावे म्हणून, असे ते म्हणाले.
‘मान्यता कायम राहील याची काळजी घेऊ’
अलिकडे लांडगे यांच्याबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे तीन ते चार आठवड्यापूर्वी मी त्यांना बोलून सांगितले होते. सुधारणा करा. अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे तक्रारी गेल्या. त्या स्ट्राँग अॅक्शन घेतील, असे वाटत होते. दरम्यान, अॅक्शन चांगली झाली नाही. त्यातून मार्ग काढावा लागेल. कुस्तीगीरांना अन्य ठिकाणी सहभागी होण्यास अडचणीत येतील, असे पवार म्हणाले. दिल्लीत कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांना भेटून त्या दुरुस्त्या करायला लावणार आहे. तर मान्यता कायम राहील याची काळजी घेऊ. आम्हाला राष्ट्रीय संघटना मदत करतील असा विश्वास पवार यांनी टीव्ही 9सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
‘संघटनेत राजकारण नाही’
खेळाच्या संघटनेत आम्ही कधी राजकारण आणत नाही. राजकारणाचा संबंध नाही. या संघटनेत अनेक पक्षाचे लोक होते. मुंबई क्रिकेटमध्ये मी होतो. माझ्यानंतर अध्यक्ष झालेले आशिष शेलार भाजपामध्ये होते. ते मंत्री होते. आम्ही एका विचाराने कामे करतो. कधी आमच्या निर्णयात मतदानही होत नाही. कारण क्रीडा संघटनेत आम्ही राजकारण आणत नाही. कुस्तीगीर संघटना सुधारण्यास विलंब झाला. त्यात सुधारणा करता आली असती. पण तसे झाले नाही. पण यात राजकारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा याच्याशी काहीच संबंध नाही, असे पवार म्हणाले.
टीव्ही 9सोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत करताना काय म्हणाले शरद पवार?
‘मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करू’
इथे पक्ष नाही. क्रीडा क्षेत्रात काम करणारे जे घटक आहेत. ते आहेत. राजकीय पक्षाचा काही संबंध नाही. क्रीडा संघटनाxत काही मतभेद असतील, तर ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणे, हीच आम्ही काळजी घेत आहोत. इथे कोणताही राजकीय पक्ष किंवा त्याला असोसिएट करणे हा विषयही मनात नाही, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.