Pune crime : जावयानं सासऱ्यावर चाकुनं केले सपासप वार; पुण्यातील खडकीतला प्रकार, स्वत:च पोलीस ठाण्यात झाला हजर
कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्यावर चाकूने (Knife) वार करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना उघड झाली.
पुणे : कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्यावर चाकूने (Knife) वार करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना उघड झाली. या घटनेनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलीस (Police) ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबुली दिली आहे. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65, रा. आकाशदीप सोसायटी, खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. उत्तरकर सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यामध्ये उत्तरकर हे गंभीर जखमी झाले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू (Dead) झाला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
2019पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडले हा उत्तरकर यांचा जावई आहे. 2019पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून पती-पत्नी वेगळे राहत आहेत. कुडले त्याच्या आईसोबत, तर त्याची पत्नी वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तर उत्तरकर यांची दोन दुकाने असून त्यांनी दोन्ही दुकाने भाड्याने दिली आहेत. तर कुडले हा वडापावची गाडी चालवतो. दरम्यान, त्यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ठ आहे.
वादाचे पर्यवसान खुनात
कुडले हा उत्तरकर यांना पत्नीला नांदायला पाठवा, असे सातत्याने सांगत होता. तर उत्तरकर हे घटस्फोट घेण्याबाबत आग्रही होते. याच प्रकरणाबाबत बुधवारी न्यायालयात तारीख होती. न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले. त्या वादाचे पर्यवसान खुनात झाले आहे.