Rain : राज्यात आतापर्यंत कसा झाला पाऊस, जुलै महिन्यातील काय आहे आयएमडीचा अंदाज
Monsoon and Rain : राज्यात मान्सून दाखल झाला. पुणे, मुंबईत जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून पाऊस सुरु आहे. परंतु हा मान्सून राज्यातील सर्वच भागात नाही. अजून अनेक भागांत मोठ्या पावसाची गरज आहे.
पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन यंदा उशिराने झाले. दरवर्षी ८ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पोहचतो. परंतु यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबले. राज्यात २५ जून रोजी मान्सून पोहचल्याची घोषणा हवामान विभागाने केली. पुणे, मुंबईमध्ये पाऊस सुरु झाला. जून महिन्याच्या शेवटचा आठवडा या दोन्ही शहरात चांगला पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही पाऊस पडला. परंतु राज्यातील अजून अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. पुणे हवामान विभागाने ही माहिती दिली. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
काय आहे राज्याची परिस्थिती
पुणे हवामान विभागाचे संचालक के.एस.होसळीकर यांनी राज्यातील पावसासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रमधील काही भागात पाऊस झाला आहे. इतर भागात अजून चांगला पाऊस झालेला नाही. राज्याला अजूनही मोठ्या पावसांची गरज आहे. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
4 July, राज्यात सध्या पावसांची स्थिती, कोकण, मध्य महाराष्ट्र मधील काही भाग वगळता, राज्याला अ९ूनही मोठ्या पावसांची गरज.IMD Forecast प्रमाणे जुलै महिन्यात चांगल्या पावसांची शक्यताये रे पावसा… pic.twitter.com/5XLbfaUasu
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2023
विदर्भात अजून प्रतिक्षा
दरवर्षी ८ जूनपर्यंत राज्यात पावसाळा सुरू होतो. त्यास आता जवळपास महिना होत आला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. विदर्भातील अनेक भागांत अजून पाऊस नाही. यामुळे पाऊस पाडण्यासाठी लोक पारंपारीक उपाय करत आहे. कुठे धोंडी काढली जात आहे तर कुठे बेडकांचे लग्न लावले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव मिठाचा धूर करत आहे. मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो, असा समज या आदिवासी शेतकऱ्यांचा आहे.
देशात काय आहे परिस्थिती
देशभरात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली. दरवर्षी ८ जुलै रोजी देशात दाखल होणारा मान्सून यंदा २ जुलै रोजी आला आहे. देशात सहा दिवस आधी मान्सून आला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 20 राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.