Pune lok sabha : त्रिपुरात भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या मराठी माणसाचे नाव पुणे लोकसभेसाठी चर्चेत
Pune News : सन २०२४ ची लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अनेक मतदार संघात संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी आता एक नाव पुढे आले आहे...
पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर अनेक इच्छुकांनी तयारी चालवली होती. आता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु आता आणखी एक नाव पुढे आले आहे. भाजप श्रेष्ठींकडून या नावालाच अधिक पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.
कोणाच्या नावाची चर्चा
राज्यात महायुती एकत्र आली आहे. तरी पुण्याची जागा अजित पवार यांचा गट आणि भाजप यांच्यामधून एकाला मिळणार आहे. शिवसेना या ठिकाणी दावा करणार नाही. अजित पवार यांच्यापेक्षा भाजप आपला दावा पुणे लोकसभेवर करणार आहे. यामुळे भाजपकडून अनेक इच्छुकांनी तयारी चालवली असताना आणखी एक नाव पुढे आले आहे. हे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आले आहे. तसेच अमित शाह यांच्या जवळचे ते व्यक्ती आहेत. त्रिपुरा राज्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांचा विचार भाजपकडून होत असल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहेत सुनिल देवधर
भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास सुनिल देवधर यांची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुरामध्ये अडीच दशक डाव्यांच्या असलेल्या प्रभावाला त्यांनी खिंडार पाडून भाजपला यश मिळवून दिले. त्रिपुरातील भाजपच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात त्यांचा जन्म झाला. संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात एक तप म्हणजे १२ वर्ष काम केले. तसेच त्या भागातील लोकांना जोडण्यासाठी त्यांनी ‘माय होम इंडिया’ नावाची एनजीओ काढली.
असा संपादन केला श्रेष्ठींचा विश्वास
दिल्लीत २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर दक्षिण दिल्लीची जबाबदारी होती. त्यावेळी भाजपने दहा पैकी सात जागा जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात २०१४ मध्ये देवधर कॅम्पेन मॅनेजर होते. त्यावेळी लागलेल्या निकालात त्यांचाही वाटा आहे. २०१४ मध्ये त्यांना पालघरची जबाबदारी दिली. सीपीएमची असलेली ही एकमेव जागा त्यांनी भाजपकडे ओढून आणली. अमित शाह यांनी त्यांना ईशान्य भारतात पाठवले. त्या ठिकाणी भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.