Supriya Sule : ‘त्या’ डायरीत काय लिहिलंय?, सुप्रिया सुळे यांचा दावा काय?; राजकीय स्फोट होणार?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथविधीवरून धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला आहे.

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल टीव्ही9 मराठीला स्पेशल मुलाखत दिली. या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. भुजबळ यांनी शरद पवार यांची राजकीय धोरणं आणि धरसोडवृत्तीवरच या मुलाखतीतून बोट ठेवलं आहे. भुजबळ यांच्या या धक्कादायक मुलाखतीने राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी एका डायरीचा दाखला दिला आहे. काय आहे ही डायरी? त्यात काय लिहिलंय? यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांची प्रत्येक मतं खोडून काढली. त्यांना टीव्ही9च्या मुलाखतीतील भुजबळांच्या विधानांबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी पर्समधून काही कागद काढले. त्यावर काही मुद्दे लिहून आणले होते. ते मुद्दे वाचून त्यांनी भुजबळांवर पलटवार केला. यावेळी त्यांनी त्यांच्या पर्सनल डायरीचाही उल्लेख केला.
मी रोज एक डायरी लिहिते. डायरी लिहिण्याची मला लहानपणापासूनची सवय आहे. दिवसभर ज्या गोष्टी होतात त्या मी डायरीत लिहिते. त्यामुळे मी कालच्या मुलाखतीतील प्रत्येक गोष्ट लिहून आणली. भुजबळ कोणत्या मिटींगबद्दल बोलले? त्यामागचे संदर्भ काय? या सर्व गोष्टी मी डायरीत पडताळून पाहिल्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
स्फोट होणार नाही
मी थिअरी म्हणून लिहित नाही. सवय म्हणून लिहिते. माझा नवरा काही बोलला तरी मी डायरीत लिहीत असते. त्यामुळे 2 जुलैच्या शपथविधीच्या रात्री काय घडलं हे मी सांगू शकते. मला आठवत नाही वगैरे असं म्हणत नाही. माझी डायरी माझा रेफरन्स पॉइंट आहे, असं सांगतानाच डायरी कधी बाहेर येणारच नाही. त्यामुळे स्फोट होणार नाही. स्फोट होईल असं माझ्या आयुष्यात काही नाही. माझं लाईफ फार बोअरिंग आहे, असंही त्या म्हणाल्या.
‘भ्रष्ट जुमला पार्टी’ नवं नाव
यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपचं नामकरणही केलं. बेरोजगारी, भ्रष्टाचारापासून भाजपने फारकत घेतली आहे. त्यामुळे आत्या म्हणून मला भाजपचं नामकरण करावं लागेल. उद्धवजी भाजपला भ्रष्ट जनता पार्टी म्हणतात. मी पुढे जाऊन भाजपचं नामकरण करते. उद्धवजी मोठे भाऊ आहेत. आत्या म्हणून मी भाजपचं नाव बदलणार आहे. ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ असं नाव मी भाजपला देत आहे. ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ म्हणजे बी जे पी, असा हल्ला त्यांनी चढवला.
समरजीत घाटगे जवाब दो
भाजप भ्रष्ट आहे. याचा पुरावा देण्यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते. समरजीत घाटगेंनी नेत्यावर आरोप केला होता. आता मी समरजीत घाटगे यांना जवाब दो म्हणते. एक लोकप्रतिनिधी नाही तर नागरिक म्हणून विचारते. समरजीत घाटगे तुम्ही जे आरोप केले ती व्यक्ती आज तुमच्याच जिल्ह्याची पालकमंत्री आहे. म्हणजे तुम्ही केलेले आरोप खोटे होते का? नसेल तर भाजपने आता त्यांची माफी मागितली पाहिजे. तुम्ही त्या नेत्याच्या घरी ईडी पाठवली. त्यांच्या बायको, मुलं आणि नातवांचा छळ केला. नंतर तुमच्यासोबत घेतलं. हा भ्रष्ट व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला.
माफी मागा
अंजली दमानिया यांनी जीआर दाखवला. त्या जीआरची अंमलबजावणी झाला की नाही ते भाजपने सांगावं. आरोप खरे असेल तर जीआर अंमलात आणा. जीआर खोटा असेल तर त्यांनी माफी मागावी. भ्रष्टाचार मुक्त भारत झाला का? तुम्ही ज्यांच्यावर आरोप केला ते तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, अशी टीका त्यांनी केली.