Weather Update | ऑक्टोबर हिटचा चटका कमी…थंडीची चाहूल सुरु
Weather Update Pune | राज्यात मॉन्सून गेल्यानंतर ऑक्टोबर हिट सुरु झाली. ऑक्टोबर हिटमुळे सर्वच शहरातील तापमान वाढले. राज्यात वाढलेल्या तापमानातून दिलासा कधी मिळणार? याची वाट नागरिक पाहत होते. नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : यंदा मॉन्सून चांगला बरसलाच नाही. सरासरी पूर्ण न करता मॉन्सूनने निरोप घेतला. मॉन्सून जाताच राज्यात ऑक्टोबर हिटचा तळाखा सुरु झाला. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान वाढले होते. यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहे. परंतु आता राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातील नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार आहे. राज्यातील ऑक्टोबर हिटचा चटका कमी झाल्यामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे थंडी जास्त पडणार नाही? अशी अपेक्षा आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात
ऑक्टोबर हिट आणि उन्हाचा चांगला चटका जाणवणाऱ्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरातील तापमानात बदल झाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगाव शहरात १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त होते. महाबळेश्वरमध्ये १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, असे एका दिवसासाठी म्हणावे लागेल.
पुणे शहराच्या तापमानात घट, मुंबईत…
पुणे शहराच्या तापमानात घट झाली. पुणे शहरात रात्रीप्रमाणे दिवसाही तापमान कमी झाले आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच मुंबईतील सांताक्रुझमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु आता राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातही काही भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पीक कापणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.