Pune Crime : कात्रज दरीत आढळला जळालेल्या अवस्थेतला तरुणाचा मृतदेह
एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Deadbody) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील कात्रज (Katraj) परिसरातील ही घटना आहे. मृतदेह जळाला असल्याने त्याची ओळख (Identity) अद्याप पटू शकलेली नाही.
पुणे : एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Deadbody) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील कात्रज (Katraj) परिसरातील ही घटना आहे. मृतदेह जळाला असल्याने त्याची ओळख (Identity) अद्याप पटू शकलेली नाही. मात्र, गाडीच्या नंबर प्लेटवरून संबंधित तरूण वानवडी भागात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की पुण्यातील कात्रज दरीत एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाची मदत घेण्यात आली. जवानांनी संबंधित तरुणाचा मृददेह दरीतून बाहेर काढला. मात्र, तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.
घातपात की अपघात?
तरुणाच्या गाडीच्या नंबरवरून हा तरूण पुण्यातील वानवडी भागात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित तरूण रागाच्या भरात घरातून दोन दिवसांपूर्वी बाहेर पडला होता, अशीदेखील माहिती समोर आली आहे. तर हा घातपात आहे की अपघात, याचा तपास आता पोलीस करत आहेत.