Pune fire incident : पुण्याच्या खराडीत फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग तासाभरानंतर आटोक्यात, बारा दुकानं खाक
खराडीतील (Kharadi) उबाळेनगर येथे फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग अग्निशामक दलाच्या जवानांनी तासाभरात आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एकूण बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
पुणे : खराडीतील (Kharadi) उबाळेनगर येथे फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग अग्निशामक दलाच्या जवानांनी तासाभरात आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एकूण बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. फर्निचरसह रेडियम, ऑटोमोबाइल, मोबाइलच्या एकूण बारा दुकानांना आगीची पूर्ण झळ बसली आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. खराडीतल्या उबाळेनगरात महालक्ष्मी लॉन्ससमोर सकाळी अकराच्या दरम्यान ही आगीची घटना घडली. यावेळी घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाची (Firebrigade) एकूण 6 वाहने दाखल झाली होती. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामकच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. यावेळी मोठ्या प्रमाणात धूर परिसरात झाला होता.
अग्निशामक जवान वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात
या आगीत सर्व दुकाने पूर्ण जळाली असून नेमकी आग कोठून लागली, याचा शोध अग्निशामक दलाकडून घेण्यात येत आहे. लाकडी फर्निचर आणि पत्र्याच्या दुकानांमुळे आग वेगाने पसरली. मात्र, जवळच्या अग्निशामक केंद्राचे जवान वेळेत पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आणता आली असल्याची माहिती सहायक अग्निशामक अधिकारी रमेश गांगड यांनी दिली.
पिंपरीतील आगीप्रकरणी समिती स्थापन
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर दोन दिवस ही आग धगधगत होती. आग लागण्याचे हे प्रकार लक्षात घेता आग नैसर्गिक कारणाने लागते, की मानवनिर्मित याचा शोध घेण्यासाठी महापालिकेने दोन सदस्यीय समिती तयार केली आहे.