Swine Flu : कोरोना कमी, आता स्वाइन फ्लूनं डोकं वर काढलं! पिंपरी चिंचवडमध्ये आठ दिवसांत 14 रुग्ण, काळजी घेण्याचं आवाहन
मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूसह सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासले आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लू (Swine Flu) डोके वर काढले आहे. गेल्या आठ दिवसात 14 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले आहे. दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाची चिंता यामुळे वाढली आहे. 2019मध्ये 19 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. स्वाइन फ्लूची लस आणि टॅमी फ्लू गोळ्या वाटप करून हा रोग आटोक्यात आणला होता. मात्र, कोरोनापाठोपाठ पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने डॉक्टरांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात आधीच डेंग्यू, चिकुनगुन्या, तीव्र ताप, थंडीचे रुग्ण आढळत आहेत. त्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे (YCM hospital) डॉ. विनायक पाटील यांनी केले आहे.
वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत भर
पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने कहर केला होता. 2017 ते 2018 या दोन वर्षात 413 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर 61 जणांचा मृत्यू झाला. 2018मध्ये 243 जण पॉझिटिव्ह आले होते. तर 34 जणांना जीव गमवावा लागला होता. आता यावर्षी पुन्हा स्वाइन फ्लू आपले हात-पाय पसरायला लागला आहे. आतापर्यंत मागील आठ दिवसांत 14 रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे स्वाइन फ्लूसह इतर व्हायरल इन्फेक्शनच्या केसेसही वाढत आहेत. वातावरणातील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी स्वाइन फ्लू वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा’
मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूसह सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. सरकारी दवाखान्यांबरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आजारांची लक्षणे दिसताच दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.