Bhor road work : पुण्यातल्या नसरापुरात ग्रामस्थांनी बंद पाडलं रस्त्याचं निकृष्ट काम; कंत्राटदाराला इशाराही दिला
इस्टिमेटची पाटी लावूनच काम चालू करावे आणि कामाचा दर्जा चांगला ठेवावा, अशी भूमिका यावेळी आक्रमक (Aggressive) ग्रामस्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. संबंधित खात्याने याचा गांभीर्याने विचार करून रस्ते उत्कृष्ट होण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भोर, पुणे : पुण्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर गावात रात्री सुरू असलेले रस्त्याचे निकृष्ट काम स्थानिक राजकीय पक्ष तसेच ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. कामाचा दर्जा निकृष्ट पद्धतीचा असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी करत हे काम बंद पाडले. पोलिसांनाही यावेळी बोलावण्यात आले होते. नियमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने (Contractor) हे काम सुरू करताना इस्टिमेटचा बोर्ड लावण्याची आवश्यकता होती. मात्र तसे न करता रस्त्याचे काम दामटवले. काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला आणि हे काम बंद पाडले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापुढे इस्टिमेटची पाटी लावूनच काम चालू करावे आणि कामाचा दर्जा चांगला ठेवावा, अशी भूमिका यावेळी आक्रमक (Aggressive) ग्रामस्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले.
‘पाठपुरावा केला होता’
काम बंद पाडल्यानंतर काही ग्रामस्थ तसेच राजकीय पक्षांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इस्टिमेटची पाटी लावण्याचे तसेच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना संबंधित कामाचे इस्टिमेट, कामाची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र काहीही होऊ शकले नाही. त्यांनी कोणतीही पाटी तर लावली नाहीच, शिवाय सुरू असलेल्या कामाची कोणतीही माहिती ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतील दिली नाही. त्यामुळे आत्ता काम बंद पाडत आहोत. आता पुढील दोन दिवसांत इस्टिमेटची पाटी लावली नाही, तर राहिलेले कामही बंद पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निकृष्ट रस्त्यांमुळे अपघातांत वाढ
संबंधित विभागाकडे चांगले रस्ते देण्याची जबाबदारी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निकृष्ट रस्त्यांमुळे अपघातांत वाढ झाली आहे. रस्त्यांवर लवकर खड्डे पडत आहेत. हे खड्डे चुकवताना अपघात होत आहेत. त्यात वाहनचालक जखमी तर काहींना आपला जीवही गमवावा लागू शकतो. खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट डांबराचा वापर अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित खात्याने याचा गांभीर्याने विचार करून रस्ते उत्कृष्ट होण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.