Pune Crime : पोलीस असल्याचं सांगून वृद्धांना फसवत होते; दोघांना नारायणगाव पोलिसांनी केली अटक
सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत सदर गुन्हा करणारा एक व्यक्ती हा बेहराम उर्फ मुस्तफा सय्यद (रा. आंबिवली, इराणी वस्ती) तसेच त्याचा एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.
नारायणगाव, जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (Narayangaon) येथे पोलीस असल्याचे सांगून वृद्ध नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने, पैसे लुबाडणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केली आहे. पोलिसांनी CCTVच्या आधारे या चोरांचा शोध घेतला आहे. मागील काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आम्ही पोलीस आहोत एवढे सोन अंगावर घालून का फिरता ते काढून या पुडीत बांधून ठेवा, असे सांगून किंवा वयस्कर लोकांना माझी आई आजारी आहे तिच्या नावाने मला दान करायचे आहे. तुमच्या अंगावरील सोन्याचा त्याला स्पर्श करा, असे सांगून हातचलाखी करून ती पुडी हातचलाखीने बदलून तसेच नोटा मोजून देतो, तुमच्या नोटा खराब आहेत असे सांगून त्या बहाण्याने पैसे काढून घेणे अश्या प्रकारचे गुन्हे वारंवार घडत होते. याला आळा घालून संबंधित आरोपींना अटक (Arrest) करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिल्या होत्या.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत सदर गुन्हा करणारा एक व्यक्ती हा बेहराम उर्फ मुस्तफा सय्यद (रा. आंबिवली, इराणी वस्ती) तसेच त्याचा एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पो. हवा. दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले हे सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी कल्याण आंबिवली येथे इराणी वस्तीमध्ये वेषांतर करून गेले. त्या ठिकाणी माहिती घेऊन समजले, की संबंधित व्यक्ती हा सध्या जुन्नर भागात कोठेतरी वास्तव्यास आहे.
जुन्नरमधल्या बारव येथे राहत होता
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथकाने जुन्नर येथे जाऊन सदर इसमाचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ही व्यक्ती जुन्नर येथे सय्यद वाडा येथील नूर महंमद सय्यद या व्यक्तीची बारव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील खोली सुमारे एक वर्षापासून भाड्याने घेऊन त्याठिकाणी अधूनमधून येऊन राहत असतो व परिसरात हातचलाखी करून वृद्ध लोकांना फसवत असतो, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी जाऊन शोध घेतला असता सदर व्यक्ती त्यावेळी बारव येथील घरी मिळून आला नाही. म्हणून गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा जुन्नर नारायणगाव भागात फिरून त्याचा शोध सुरू केला.
दाखवला पोलिसी खाक्या
तांत्रिक विश्लेषणानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही व्यक्ती नारायणगाव भागात असल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव येथे शोध घेत असता ओझर फाटा येथे दोन इसम एका मोटरसायकवर रस्त्याच्या बाजूला संशयितरित्या थांबलेले दिसून आले. त्या दोघांनी डोक्यात कमांडोटाइप कॅप घातलेल्या असल्याने त्यांच्यावरील संशय बळावला. गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच त्यांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता सुरुवातीला त्यांनी वेगळी नावे आणि पत्ता सांगितला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी त्यांची खरी नावे बेहराम उर्फ मुस्तफा इज्जतअली सय्यद (वय 45, रा. आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ, इराणी वस्ती) आणि खैबर अजीज जाफरी (वय 46, रा. स्वामी विवेकानंद नगर, वासीन रेल्वे स्टेशनजवळ) अशी सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे काही दागिने तसेच ते राहत असलेल्या जुन्नर येथील खोलीतून काही दागिने आणि दोन मोटारसायकल, मोबाइल, छोटे वजनकाटे आणि इतर साहित्य मिळून आले. सदर आरोपींकडे गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी खालील ठिकाणी एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.