Pune crime : मानसिक छळ करून घर सोडण्यास भाग पाडलं, मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत दोघांना पुण्यात अटक
पीडित व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतरही कुटुंबातील सदस्यांना संबंधित आरोपी सतत घरी येऊन त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होते. कुटुंबीयांनी त्यांच्याविरुद्ध बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुणे : मनी लाँडरिंग (Money laundering) विरोधी कायद्यांतर्गत 30 वर्षीय व्यक्तीकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने (AEC) ही कारवाई केली आहे. पीडित व्यक्तीने राहुल बाळकृष्ण कोंढरे आणि विजय गणपत कुम्हारकर या आरोपींकडून 8 ते 10 टक्के व्याजाने 5 लाख रुपये घेतले होते. या दोघांनी त्या व्यक्तीकडून व्याजासह मूळ रक्कम वसूल केली आणि रक्कम परत करूनही, या दोघांनी त्याला नोटरीकृत करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. यामध्ये त्याने आपले तीन फ्लॅट आरोपींना विकण्याचे मान्य केले होते. या दोघांनी त्याचा मानसिक छळ केला. परिणामी तो 3 सप्टेंबर 2021 रोजी घरातून निघून गेला आणि त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhgad Road Police Station) हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली, असे तपासकर्त्यांनी सांगितले.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
पीडित व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतरही कुटुंबातील सदस्यांना संबंधित आरोपी सतत घरी येऊन त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होते. कुटुंबीयांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) 386, 387, 452, 504, 506 आणि कलम 34 अन्वये बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी
या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, की आरोपींनी पीडित व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्येकी 5 लाख रुपये मागितले. ते न दिल्यास कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी या आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्ही त्यांना तत्काळ अटक केली, अशी माहिती दिली.
आरोपींना पोलीस कोठडी
ही घटना 1 जून 2019 ते 23 ऑगस्ट 2022 दरम्यान घडली. पीडित व्यक्ती आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी कोंढरे याच्याकडून वार्षिक 10 टक्के व्याजाने पाच लाख रुपये उसने घेतले. तसेच कुम्हारकर याच्याकडून आठ टक्के व्याजाने पाच लाख रुपये उसने घेतले. त्यांनी कर्जाची रक्कम व्याजासह परत केली होती. मात्र, तरीही दोघेही प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी करत होते. हे दोघेही त्याला धमक्या देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.