पुणे लोकसभा जागेवरुन ठाकरे-पवार यांच्यात होणार बिघाडी, उद्धव ठाकरे यांच्याकडे झाली ही मागणी
sharad pawar uddhav thackeray : लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. त्यांच्यामध्ये या निवडणुकीवरुन बिघाडी होण्याची शक्यता आहे.
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी पक्षातील शरद पवार गट आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आहे. आगामी सर्व निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढवण्याच्या घोषणा नेत्यांकडून वारंवार केली जाते. परंतु निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. यामुळे शरद पवार यांच्या जिल्ह्यात त्यांची कोंडी होणार आहे.
शिवसेनेची झाली बैठक
शिवसेना नेते उद्धव ठाकरे सध्या मतदार संघानिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये पुणे जिल्ह्याची बैठक त्यांनी घेतली. यावेळी शिरूर लोकसभेच्या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा करण्याचा निर्णय झाला आहे. महाविकास आखाडीकडून उद्धव ठाकरे गट ही जागा मागणार आहे. या जागेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. शरद पवार गटात असलेले खासदार अमोल कोल्हे या ठिकाणावरुन विजयी झाले होते. गेल्या लोकसभेवेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत या ठिकाणी झाली होती.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
बैठकीत खडकवासला विधानसभेची जागा शिवसेनेने लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मावळ लोकसभेवरही उद्धव ठाकरे यांची शिवसेना दावा करणार आहे. मात्र जागावाटपात जे होईल ते होईल, तुम्ही तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहे. शिरूर आणि मावळ लोकसभा आढावा बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले.
बिघाडी होण्याची शक्यता
पुणे जिल्हा हा शरद पवार यांच्या होमटाऊन जिल्हा आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे शरद पवार यांची ताकद कमी झाली आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील मतदार संघात दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामुळे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या या मागणीवर अजून राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया आली नाही.