Rain | राज्यात अवकाळीचे संकट कायम, हवामान विभागाने काय दिले अपडेट
unseasonal rain | राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पुढील २४ तासांत पुन्हा पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे.
पुणे | 11 नोव्हेंबर 2023 :मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. पावसामुळे वातावणात बदल झाला आहे. अनेक शहराच्या तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान यवताळमध्ये नोंदवण्यात आले. यवतमाळचे तापमान १६ अंश सेल्सियस होते.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस
शुक्रवारी पुणे शहर आणि जिल्ह्यांत सर्वत्र पाऊस झाला. पुणे शहरात आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु असताना पुणे शहरात पाऊस झाला. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाचा फटका शेतात काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. पावसाचा फटका सातारा शहरासह ग्रामीण भागाला बसलेला पहायला मिळाला. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
अहमदनगर जिल्ह्यांत पाऊस
अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीय. शुक्रवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूरसह परिसरात जोरदार पाऊस कोसळलाय. राहाता तालुक्यातील लोणी परिसरातही जोरदार पाऊस आल्याने दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
मुंबईतील प्रदूषण संपण्यासाठी पाऊस ठरला फायदेशीर
मुंबईत 1 ऑक्टोरबर पासून ते 8 नोव्हेंबर म्हणजे सव्वा महिना प्रदूषण प्रचंड वाढले होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे मुंबईतील प्रदूषण कमी झाले. हवेची गुणवत्ता सुधारली. पावसामुळे 200 एक्यूआयवर गेलेली हवेची गुणवत्ता 94 एक्याआयवर खाली आली आहे.
10 Nov, 8.30 pm Pune rainfall from morning. Widespread, moderate to heavy rains. pic.twitter.com/PEeoMQpeOQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 10, 2023
कोकणात विजांच्या कडकडाटासह पाऊस
कोकोणातील चिपळूण, रत्नागिरीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. चिपळूणमध्ये शुक्रवारी सलग एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर संततधार सुरु होती.