पुणे : पुण्यातून एक खूप वाईट बातमी समोर आलीय. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. चित्रपटसृष्टीतील ही हानी भरून काढता न येणारी अशी आहे.
विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार आहेत. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय.
सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.
या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.