Video: जेव्हा मोदींनी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार केला
निमित्त होत बाबासाहेबांच्या शंभराव्या वर्षातल्या पदार्पणाचं. ह्या सत्कार समितीच्या अध्यक्षा होता लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन. राज ठाकरे, आशा भोसले, सचिन तेंडुलकर अशी दिग्गज मंडळीही ह्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा अलिकडेच पुण्यात नागरी सत्कार करण्यात आला होता. निमित्त होत बाबासाहेबांच्या शंभराव्या वर्षातल्या पदार्पणाचं. ह्या सत्कार समितीच्या अध्यक्षा होता लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन. राज ठाकरे, आशा भोसले, सचिन तेंडुलकर अशी दिग्गज मंडळीही ह्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. याच कार्यक्रमात विशेष हजेरी होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची. अर्थातच कोरोनाच्या नियमांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन सहभागी झालेले होते. याच कार्यक्रमात मोदींनी बाबासाहेबांचा शब्दसुमनांनी गौरव केला. एवढच नाही तर त्यांच्या कार्यावर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पंतप्रधान बोलले. 13 ऑगस्ट रोजी पुण्यात हा कार्यक्रम पार पडला होता.
मोदी नेमकं काय म्हणाले? नमस्कार, ह्या कार्यक्रमात आपल्याला आशीर्वाद देणारे बाबासाहेब पुरंदरेजी, बाबासाहेब सत्कार समितीचे अध्यक्ष सुमित्राताईजी, आणि शिवशाहीत आस्था ठेवणारे बाबासाहेबांचे सर्व अनुयायी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी सुरुवातीस साष्टांग (हात जोडत) नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत जी शिकवण दिलेली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती मला ईश्वरानं द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे (पुन्हा हात जोडत) करतो. मी आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंना आयुष्याच्या शंभराव्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल ह्रदयापासून शुभेच्छा देतो. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद जसा आतापर्यंत आपल्या सर्वांना मिळालाय तसाच पुढेही दिर्घकाळासाठी भेटत राहो अशी मंगलकामना करतो.
योगायोग मोदी पुढं म्हणाले, हा खरोखरंच चांगला योग आहे की, ज्यावेळेस बाबासाहेब हे शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत, त्याच वेळेस आपला देशही स्वातंत्र्यांच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करतोय. मला खात्री आहे की, हा माँ भारतीचाच आशीर्वाद असल्याची अनुभूती बाबासाहेबांना येत असावी. एक आणखी योग आहे, जो स्वातंत्र्यांच्या 75 वर्षासाठी आपल्याला प्रेरणा देतो. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिलं, त्यांच्या कार्याचं लिखाण करण्याचं काम सुरु झालेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे असच कार्य कित्येक दशकांपासून करत आहेत. एवढ्याच एका मिशनसाठी त्यांनी स्वत:चं आयुष्य खर्ची घातलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम बाबासाहेबांनी केलं, त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी राहू. त्यांच्या ह्या कार्याप्रती कृतज्ञ होण्याची संधी आपल्याला मिळाली हे भाग्यच.