Viral infection : पुण्यात वाढल्या व्हायरल इन्फेक्शनच्या केसेस; वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितली कारण आणि उपाय…
आत्तापर्यंत आम्ही अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक संकुलांवर कारवाई केली आहे, जिथे डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
पुणे : व्हायरल इन्फेक्शन (Viral infection) आणि इन्फ्लूएंझाच्या केसेस पुण्यात वाढत आहेत. डॉक्टरांनीच ही माहिती दिली आहे. अशाप्रकारच्या इन्फेक्शनच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले आहे. रहिवाशांनी अनेक भागात डासांच्या त्रासाबद्दल तक्रारी केल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने सांगितले, की ज्या भागात डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे रूग्ण आहेत, त्या भागातच धूर फवारण्यात आला आहे. पावसामुळे विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. तापमानातील बदलामुळे हे होत आहे. दिवसा उष्णता वाढते आणि आर्द्रता वाढते. संध्याकाळच्या वेळी जोरदार पाऊस पडतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी (Low immunity) असलेल्या अनेक रुग्णांमध्ये खोकला, सर्दी आणि ताप यासारखी फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. अशा विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासाठी घरगुती गरम अन्न खावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. वाघमारे म्हणाले.
‘संततधार पावसामुळे डासांची संख्याही वाढली’
अलीकडच्या काळात ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीची तक्रार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांमध्ये शिंका येणे, नाक वाहणे आणि डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे सामान्य आहेत. व्हायरल इन्फेक्शन पसरण्यामागे गर्दी आणि पावसाळा हे मुख्य कारण आहेत. योग्य निदान करण्यासाठी आम्हाला रुग्णाची पार्श्वभूमी तपशीलवार आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांसह शारीरिक तपासणी आवश्यक असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. संततधार पावसामुळे डासांची संख्याही वाढली आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. यामुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
‘अनेक सोसायट्यांवर कारवाई’
ज्या ठिकाणी डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून आले आहेत, तेथे फ्युमिगेशन करण्यात आले आहे. रहिवाशांनी पाणी साचू देऊ नये आणि डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. या हंगामात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. आत्तापर्यंत आम्ही अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक संकुलांवर कारवाई केली आहे, जिथे डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.