MPSC पास दर्शना पवार हिला मारल्यानंतर राहुल काय करणार होता?; पुण्यातून फरार होऊन सर्वात आधी ‘हे’ शहर गाठलं
एमपीएससी पास दर्शना पवार हिची हत्या केल्यानंतर राहुल हंडोरे याने सर्वात आधी पुणे सोडलं. त्यानंतर तो काही शहरात गेला. आपली ओळख पटू नये, आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये याची त्याने खबरदारी घेतली होती.
पुणे : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे. राहुल याने दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल सर्वात आधी कुठे गेला होता?, कोणत्या कोणत्या शहरात तो लपत फिरत होता? त्याचा नंतरचा प्लान काय होता? याची माहितीही त्याने पुणे पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
दर्शना पवार हिची हत्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी राहुल हंडोरे पुण्यातून पळून गेला होता. पुण्यातून पळून गेल्यानंतर त्याने रेल्वेनेच प्रवास करण्यावर भर दिला होता. तो सर्वात आधी सांगलीला पोहोचला होता. त्यानंतर तो गोव्यात गेला. पण गोवा हे त्याचं थांबण्याचं शेवटचं ठिकाण नव्हतं. त्यानंतर तो चंदीगडला गेला. नंतर तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला होता.
संपूर्ण प्रवासात मोबाईल बंद
केवळ आणि केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो ठिकाणं बदलत होता. त्यानंतर तो हावडाहून मुंबईला आला. या सर्व प्रवासात त्याने मोबाईल बंद ठेवला होता. आपलं लोकेशन कळू नये म्हणून त्याने ही खबरदारी घेतली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या काळात त्याने आपल्या नातेवाईक आणि मित्रांना अनेकवेळा फोन केला होता. पण त्याने स्वत:च्या फोनवरून एकही फोन केला नाही. प्रवासात प्रवाशांकडून फोन घेऊन त्याने नातेवाईक आणि मित्रांना फोन केले होते. त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून नातेवाईक आणि मित्रांना फोन केले होते.
म्हणून पोलिसांच्या जाळ्यात येत नव्हता
पोलिसांनी इकडे त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली होती. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी राहुलच्या प्रवासाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. दर्शनाची हत्या केल्यानंतर पोलिसांना सतत गुंगारा देण्याचा आणि या प्रकरणावरून पोलिसांचं लक्ष विचलित करण्याचा त्याचा प्लान होता. आपली ओळख पटू नये, याचीही त्याने संपूर्ण प्रवासात खबरदारी घेतली. पोलिसांनी आपल्याला ट्रेस करू नये म्हणून त्याने जाणूनबुझून प्रयत्न केले.
या प्रवासात तो अनोळखी लोकांकडूनच जेवण घ्यायचा. फोन कॉलवरून पोलिसांनी आपल्याला पकडू नये, आपलं लोकेशन पोलिसांना कळू नये म्हणून त्याने पोलिसांना सतत मिसलिड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच तो इतर प्रवाशांचे फोन वापरायचा आणि कुटुंबियांशी संपर्क झाल्यावर लगेच आपला ठिकाणा बदलायचा. त्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात येत नव्हता.
अखेर टिप मिळाली
राहुलने पोलिसांना कितीही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला तरी अखेर पोलिसांना एक टिप मिळाली. त्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात आला. राहुल मुंबईच्या अंधेरी स्टेशनला येणार असल्याचं कळलं आणि पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडलं. राहुल अंधेरीवरून पुण्याला येणार होता. पण पुण्याला पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.