एमपीएससी पास दर्शना पवार अन् राहुल हंडोरे यांच्यामध्ये काय झाले? राहुलच्या मित्राने सांगितला किस्सा
MPSC Pune Darshana Pawar : पुणे येथील एमपीएससी परीक्षा पास झालेली दर्शना पवार हिची हत्या झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही हत्या दर्शना पवार हिचा मित्र राहुल हंडोरे यानेच केली. दोघांचे संबंध कसे होते, यावर राहुल याच्या मित्रांनी माहिती दिली.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. दर्शना पवार हिचा मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टम अहवालातून बाहेर आले. त्यानंतर या सर्व प्रकरणात तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यावर संशय गेला. पुणे पोलिसांनी पाच पथके तयार करुन तिचा शोध सुरु केला. त्याला मुंबईत अटक करण्यात आली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
राहुल अन् दर्शनाची ओळख कधीपासून
राहुल हंडोरे अन् दर्शना पवार यांची ओळख लहानपणापासून होती. राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवाडी येथील रहिवासी आहे. या ठिकाणीच दर्शना हिचे मामा राहतात. राहुल याचे घर अन् दर्शनाच्या मामांचे घर शेजारी शेजारी होते. त्यामुळे दोघांची ओळख लहानपणापासून होती. राहुल यांची घरची परिस्थिती सामान्य होती. त्याचा भावाला कायमस्वरुपी रोजगार नव्हता.
दर्शना राज्यात आली तिसरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दर्शना पवार राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यामुळे आता ती वर्ग १ ची अधिकारी होणार होती. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शना राहुल यांच्यापासून लांब राहू लागली, असे राहुल हंडोरे याच्या मित्रांनी सांगितले. इतकेच नाही तर दर्शना हिने राहुल याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राहुल नाराज राहत होता.
त्यानंतर दर्शनाची झाली हत्या
राहुल याने दर्शना पवार हिला राजगड किल्ल्यावर ट्रेकसाठी नेले. दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला सकाळी किल्ला चढण्यासाठी गेले. गड चढत असल्याचे सर्व CCTV फुटेजमध्ये दिसून आले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत होते. मात्र त्यानंतर सकाळी 10 वाजता राहुल हंडोरे हा एकटाच परत आला. त्यामुळे त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत राहुल हंडोरे याला मुंबईत अटक केली.