Raigad Landslide : रायगडमधील दरड कोसळून मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
रायगड जिल्ह्यातल महाड आणि पोलादपूर तालुक्यातील गावांमध्ये दरड कोसळून 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केलाय. तसंच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 35 घरं ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. त्यातून आतापर्यंत 38 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर रायगडमधील पोलादपूर तालुक्यात भूस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनांची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केलाय. तसंच महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं आहे. (More than 50 people died in landslide in Raigad district, PM Narendra Modi expressed grief on Twitter)
‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. जखमी व्यक्त लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2021
तळीये गाव उद्ध्वस्त, 38 मृतदेह मिळाले
महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलादपूर तालुक्यात भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.
संबंधित बातम्या :
चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आला; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू
More than 50 people died in landslide in Raigad district, PM Narendra Modi expressed grief on Twitter