Police Recruitment – 2023 | पोलीस भरतीसाठी दलालाने मागितली इतकी लाच, आरोपीला झाली अटक
वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीसाठी पोलीस भरतीचे उमेदवार रस्त्यावर झोपत आहेत, मैदानात भर उन्हात पेपर लिहीत आहेत. चांगली बीएस्सी झालेली मुलेही पोलीस शिपाई होण्यासाठी सराव करताना दिसत आहेत. अशात फसवणूकीचे प्रकार वाढले आहे.
अलिबाग : राज्य भरात पोलीस दलाची मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सुशिक्षित पदव्युत्तर शिक्षण झालेले तरूणही सरकारी नोकरी म्हणून रांगेत असतात याचा फायदा काही भामटे घेत असून लोकांना नाहक लुबाडत आहेत. अशाच प्रकारे एका पित्याने त्याच्या लेकाला पोलीस दलात भरती करण्यासाठी एका दलालाला आपल्या आयुष्याची जमापुंजी दिली. परंतू नोकरी काही मिळाली नसल्याने आपली पुरती फसगत झाल्याचे त्यांच्या ध्यानी आले. त्यांनी त्वरीत पोलीसांना तक्रार केल्याने आरोपीला बेड्या पडल्या आहेत.
पोलीस दलाच्या नोकरीसाठी अनेक तरूण मुले राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून उन्हाताणात राबत आहेत. वाढती बेकारी आणि सरकारी नोकरी यामुळे उच्च शिक्षित तरूणांनाही पोलिसाच्या नोकरीचे आर्कषण असते. अशाच वातावरणाचा दलाल फायदा घेत आहेत. आणि सर्वसामान्यांची लाखो रूपयांना फसवणूक करीत आहेत. असाच प्रकार रोहा येथे उघडकीस आला आहे. रायगड पोलीस दलात भरती होण्यासाठी एका व्यक्तीला दलालांनी गंडा घातला आहे. रोहा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आधी एक लाख रूपये घेतले
पी.बी.मोकल याने फिर्यादी पित्याला त्याच्या मुलाला पोलीस दलात चिकटवून देतो असे आमीष दाखविले. त्याने आपली वरपर्यंत ओळख असून तुमचे काम होणार म्हणजे होणार असे आश्वासन दिले. त्यांनी सात लाख रूपयांची थेट मागणीच केली. यानंतर फिर्यादीचा भाऊ, पुतण्या आणि मुलगा दलाल मोकल याला भेटायला पेण येथे गेले. तेथे मोकल यांना त्यांनी ठरल्याप्रमाणे काम होण्याच्या आधी एक लाख रूपये घेतले. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होऊनही लेटर काही आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांनी शेवटी पोलीस ठाणे गाठले. रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात आरोपीला हजर केल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बावर करीत आहेत.
आमीषाला बळी पडू नये
रायगड पोलिसांनी एक आवाहन करीत सर्व उमेदवारांना सावधान केले आहे. ही पोलीस भरती प्रक्रिया अगदी काटेकोरपणे राबविण्यात येत असून यात कोणत्याही बाह्य घटकांना हस्तक्षेप नाही. संपूर्ण गुणवत्ता आणि इतर शारीरिक चाचण्या पूर्ण केल्यावरच उमेदवारांची निवड होत आहे. त्यामुळे गैरप्रकारांनी पोलीस भरतीत थारा नसल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे. कोणतीही व्यक्ती पैसे मागत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या ०२१४१-२२८४७३, २२२०२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीसांनी केले आहे.