राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष, राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला
mns raj thackeray | मनसे नेते राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पदवीधर निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच मनसे सिनेट निवडणूक लढवणार असल्याते त्यांनी सांगितले. राज्यात जातीय द्वेष निर्माण करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अक्षय-मंकनी, ठाणे | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरु झाले. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरु झाले आहे. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. परंतु कोणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचे मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही. आजपर्यंत कोणत्याही जातीच्या व्यक्तीने कोणत्या जातीचे कल्याण केले? हे सांगा, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यात शरद पवार यांचे नाव न घेता सांगितले.
मनोज जरांगे यांच्यामागे कोण
राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आरक्षणासाठी आहे. परंतु कायद्यानुसार असे आरक्षण मिळू शकत नाही, हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे. जरांगे यांच्या मागे कोण आहे? हे कालांतराने समोर येणार आहे.
मराठी पाट्यांचा विषय सरकार काहीच करत नाही
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका का होतात? हे मला आजपर्यंत कळले नाही. मुंबई आणि कोकण मतदार संघाच्या निवडणुका लागल्या. त्याच्या आढावा घेण्यासाठी मी ठाण्यात आला. सिनेट निवडणूक मनसे लढवणार आहे. सण कसे साजरे करायचे आहे. कोर्ट ठरवणार आहे. परंतु कोर्टाने दिलेले आदेश पाळले जात नाही, त्याकडे कोर्टाचे लक्ष नसते. मराठी पाट्यांचा विषयात मनसेमुळे कोर्टाने आदेश दिले. त्यानंतर अनेक शहरांत मराठी पाट्या दिसतात. परंतु त्याच्याविरोधात व्यापारी कोर्टात जातात. महाराष्ट्रात राहणारे व्यापारी मराठी पाट्यांच्याविरोधात भूमिका घेतात. मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार काय करत नाही.,