Rajyasabha Election : शिवसेनेचा होता म्हणून पडला, राष्ट्रवादीचा असता तर…सुजय विखेंचा महाविकास आघाडीला खोचक टोला
राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर मी तुम्हाला लिहून देतो निवडून आला असता, शिवसेनेचा उमेदवार होता म्हणून राष्ट्रवादीने हात काढून घेतला, असे म्हणत सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.
अहमदनगर : राज्यसभेच्या निवडणुकीतला (Rajyasabha Election)संजय पवारांचा पराभव हा शिवसेनेच्या (Shivsena) जिव्हारी लागला असतानाच आता भाजप नेत्यांनी यावरून जोरदार टोलेबाजी सुरू केली आहे. तसेच राष्ट्रवाधीपासून सावध राहा असा सूचका इशाराच सेनेला दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचे गणित हे राष्ट्रवादीला धरून चालले होते. राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर मी तुम्हाला लिहून देतो निवडून आला असता, शिवसेनेचा उमेदवार होता म्हणून राष्ट्रवादीने हात काढून घेतला, असे म्हणत सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. संजय पवारांना निवडून आणण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही, राष्ट्रवादी जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत शिवसेना पक्ष पूर्णपणे वाचणार नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला सूचक इशाराही केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शिवसेनेच्या आमदारांची नाराजी दिसून येईल, असेही विखे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीपासून सावध राहा
सुजय विखेंचा शिवसेनेला सल्ला
तर विखे एवढेच बोलून थांबले नाही, याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं सोज्वळ व्यक्तीमहत्व आहे, पण मला वाईट वाटतं ते चुकीच्या माणसांसोबत आहेत. शिवसेना राष्ट्रवादी सोबत राहिली तर आणखी धोका पाहायला मिळू शकतो, अशीच स्थिती राहिली तर हे आमदार वीस-पंचवीस वर आल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशाराच विखेंनी देऊन टाकला आहे.
दानवेंच्या पुत्राचा गौप्यस्फोट
राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली, गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार यांचं नाव पहिलं असायला हवं अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी दिलीय. राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनी भाजपला मदत केल्याचा आमदार संतोष दानवे यांनी दावा केलाय. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे फुटून महाविकास आघाडीला मतदान करतील असा दावा केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना आमदार संतोष दानवे यांनी हा नवीन दावा केलाय.
निधी देताना विचार करावा लागेल
कालच्या पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल , आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकत माप दिलं , विकासाच्या कामे आमच्या बरोबरीने करवून घेतली आणि कालच्या निवडणुकीत मतदान करताना विचार केला गेला नाही, यापुढे अपक्ष आमदारांना निधी दिल्या जाणार नाही, असे स्पष्ठ वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वेडीट्टीवार यांनी बुलडाणा येथे केले त्यामुळे आता आणखी काही अपक्ष आमदार महाविकास आघाडीपासून दुसराले जेण्याची शक्यता आहे.