‘सन्माननीय राजसाहेबांना…’, पाऊल पुढे टाकण्याआधी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट
महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. विविध वृत्त वाहिन्यांवर यावरुन डिबेटचे कार्यक्रम होत आहेत. आता महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. 'त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो - जरा....'

महाराष्ट्रात सध्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय मनोमिलन होणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. विचारधारा, मुद्दे समान असूनही गेली कित्येक वर्ष या दोन्ही चुलत बंधुंनी परस्पराविरोधात राजकारण केलं आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीमध्ये दोघांचा जनाधार घटलेला आहे. अशावेळी हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकतं, असं अनेकांना वाटतं. ही चर्चा सुरु झाली, ती राज ठाकरे यांनी मुलाखतीत केलेल्या एका विधानामुळे. “महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.
राज यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे करताच, दुसऱ्याबाजूने लगेचच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिसाद दिला. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकत्र येण्याची तयारी दर्शवली. पण त्यांनी एक अट ठेवली. “महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. पण या चोरांना गाठीभेटी आणि कळत न कळत गाठीभेटी आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची. मग टाळी देण्याची हाळी द्यायची” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवताच विविध चर्चा, प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला – उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे.
स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या…
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) April 20, 2025
‘राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला’
दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण सुरु झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी X वर एक पोस्ट केली आहे. “सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला. उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे” असं योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.