Eknath Shinde:सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु.. बंडखोरांकडून एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी, तर मुंबईत भाजपा कोअर कमिटीची बैठक
भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून जरी सत्तास्थापनेच्या दाव्यांची चर्चा सुरु झाली असली , तरी हा मार्ग सोपा नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, त्याला उत्तर न दिल्यास होणारी कायदेशीर लढाई ही पहिली अडचण असणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळते की त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो, हेही अद्याप निश्चित झालेले नाही.
मुंबई– राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून आत्तापर्यंत बंडखोरांबाबत चर्चा सुरु होती, आता ही चर्चा पुढे सरकू लागली आहे. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती आहे. गुवाहाटीत झालेल्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली आहे. पुढचा आठवडा राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 39 तर 10 अपक्ष आमदार आहेत. अशा स्थितीत बंडखोरांचा नेताच मुख्यमंत्री (Chief Minister)व्हावा, अशी मागणी बंडखोरांतील काही मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे. दुसरीकडे राज्यातही भाजपाने (BJP )याबाबतच्या घडामोडी सुरु केल्या आहेत असे म्हणावे लागेल.
भोजपाची को्अर कमिटीची बैठक सुरु
तर दुसरीकडे आत्तापर्यंत या प्रकरणात वेट अँड वॉचच्या भूमिकेत असेलल्या भाजपाने आता पुढची तयारी सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भाजपाची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. जर राज्यात सत्तास्थापनेच्या काही हालचाली असतील तर त्याआधी कोअर कमिटीची बैठक होईल, असे चंद्रकांत दादा पाटील यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपातील नेत्यांशी आणि सहयोगी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरु आहे.
भाजपा आणि शिंदे यांच्याच चर्चा झाल्याची माहिती
दोन दिवसांपूर्वी बडोद्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रात्री भेट झाल्याची महिती आहे. त्याच दिवशी अमित शाहही बडोद्याच्या सर्किट हाऊसमध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे. या बैठकीत सत्तास्थानेचा फॉर्म्युला ठरला असण्याची शक्यता आहे. मात्र अशी बैठक झाली नसल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र आत्ताची सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, आता राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यापर्यंतच्या घडामोडींना आता वेग आलेला दिसतो आहे.
सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी अनेक अडचणी
भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून जरी सत्तास्थापनेच्या दाव्यांची चर्चा सुरु झाली असली , तरी हा मार्ग सोपा नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, त्याला उत्तर न दिल्यास होणारी कायदेशीर लढाई ही पहिली अडचण असणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळते की त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो, हेही अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांना शिवसेना म्हणून मान्यता मिळते, की दुसरे एखादे नाव त्यांना स्वीकारावे लागते, हेही पाहावे लागणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यास होणारी फ्लोअर टेस्ट महत्त्वाची असणार आहे. शिवसेना आक्रमकपणे महाराष्ट्रात येणाऱ्या आमदारांना विरोध करण्याची शक्यता आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यासच सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होईल, अशी शक्यता आहे.