वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता! 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी
वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वर्धा : राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशावेळी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.(Restrictions re-imposed in Wardha district due to increasing prevalence of corona)
औषधी दुकान वगळता सर्व बाजारपेठा उद्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. इतकच नाही तर लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह वर्धा शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे वर्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून खबरदारी म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.
हिंगणघाटातील 75 विद्यार्थ्यांना कोरोना
हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवतण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
फक्त दोन दिवसात या निवासी वसतिगृहातील तब्बल 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे दहा ते बारा वर्षे या वयोगटातील आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
नागपूर कोरोना अपडेट
>> नागपुरात आज पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ
>> आज 596 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
>> 5 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
>> तर 279 जणांनी केली कोरोना वर मात
>> एकूण रुग्ण संख्या – 140384
>> एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 131420
>> एकूण मृत्यू संख्या – 4247
संबंधित बातम्या :
Restrictions re-imposed in Wardha district due to increasing prevalence of corona